धुळे। धुळे महानगरपालिकेने स्नेहनगरात बिओटी तत्वावर जलतरण तलाव सुरु केला असून या कामाचे फुकटचे श्रेय घेणारे नगरसेवक सोनल शिंदे हे आयत्या पिठावर रेघोट्या ओढीत असल्याचे पत्रक महापौर कल्पना महाले यांनी प्रसिध्दीस दिले आहे. या पत्रात म्हटले आहे की, 30 वर्षांपूर्वी तत्कालीन नगर पालिकेने स्नेहनगरात जलतरण तलावाचे काम सुरु केले होते. मात्र तांत्रिक अडचणींमुळे हे काम वर्षानुवर्षे रखडले होते. त्या कामातील तांत्रिक त्रुटी दूर करुन हा तलाव धुळेकरांसाठी खुला व्हावा यासाठी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी प्रयत्न करुन बिओटी तत्वावर ठेकेदारास तयार केले व तलावाचे काम पूर्णत्वास आणले.
फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न
मात्र या कामाशी काहीही संबंध नसणारे नगरसेवक सोनल शिंदे हे कामाच्या ठिकाणी उभे राहून व फोटो काढून फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. या तलावाच्या कामाला सुरुवात झाली त्यावेळी अवघ्या चार वर्षाचे असलेले सोनल शिंदे यांना कळत तरी होते का? असा प्रश्नही महापौर महाले यांनी या उपस्थित केला आहे. वर्षानुवर्षे तांत्रिक त्रुटीमुळे बंद असलेला हा तलाव चालविण्यासाठी मनपाने 3 वेळा निविदा काढून ही कुणी पुढे आले नाही. मात्र धुळेकरांची सोय व्हावी म्हणून राजवर्धन कदमबांडे यांनी विद्यमान ठेकेदारास आग्रह करुन हे काम पूर्ण करुन घेतल्याने हा तलाव आता धुळेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. ज्यांच्या राजकारणाचा उदयच राजवर्धन कदमबांडे यांच्यामुळे झाला. केवळ त्यांच्याच मुळे नगरसेवक आणि स्थायी समिती सभापतीपद मिळाले ते सोनल शिंदे कदमबांडे यांनी केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. त्यांचा हा प्रयत्न म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचा प्रयत्न असल्याचे महापौर कल्पना महाले यांनी म्हटले आहे.