जलदिंडीच्या स्वागतासाठी यंदा जलपर्णीमुक्त पवना

0

पिंपरी-चिंचवड : मागील 42 दिवसांपासून सातत्याने रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीतर्फे ’जलपर्णी मुक्त, स्वच्छ सुंदर पवनामाई उगम ते संगम’ हा उपक्रम सुरु आहे. या उपक्रमामुळे यंदाच्या जलमैत्री जलदिंडीचे स्वागत ‘जलपर्णीमुक्त पवना’ करणार आहे. या उपक्रमाचे कौतुक देश का सच्चा हिरो म्हणून ओळख असलेले चंद्रकांत राधाबाई दामोदर कुलकर्णी यांनी करत 51 हजार रुपयांचा धनादेश रविवारी दिला. दरम्यान, रविवारी रावेत घाटावर अडीचशे स्वयंसेवकांच्या मदतीने पाच ट्रक जलपर्णी बाहेर काढली. आजपर्यंतच्या उपक्रमात 90 ट्रक जलपर्णी बाहेर काढली आहे.

संकल्पपूर्ती होणारच
कुलकर्णी म्हणाले, रोटरी वाल्हेकरवाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर व सहभागी सर्व सामाजिक संस्थांनी हा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे त्यांचे कामातील सातत्य पाहून मी आज हा 51 हजाराचा धनादेश सुपूर्द करत आहे. या कार्याची निश्‍चित संकल्पपूर्ती होईल. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी देखील या उपक्रमाला भेट देऊन कामाची पद्धत समजावून घेतली.

22 संघटना सहभागी
रविवारच्या अभियानात तळेगावचे सुधाकर शेळके, पीसीसीएफचे गणेश बोरा, धनंजय शेठबाळे, महेश नंदे गुरुजी व पवना मावळातील सर्व सहकारी या अभियानात सामील झाले होते. यासाठी 22 सामाजिक संघटना, खासगी कंपन्या, महिला बचतगट यामध्ये सामील सुनील अण्णा शेळके फाऊंडेशनच्या मदतीने सोमनाथ आबा मुसुडगे आणि रोटरीचे सदस्य पुढील आठवडाभर या उपक्रमासाठी काम करणार आहेत.

गुरूवारी जलदिंडीचे आगमन
जलदिंडीसाठी सोमवारपासून पवनानगर ते रावेत या परिसरात पुढील आठवडाभर पवना नदी स्वच्छता अभियान सुरू राहणार आहेत. यंदा गुरुवारी (दि. 21) येणार्‍या जलमैत्री जलदिंडीच्या स्वागतासाठी जलपर्णीमुक्त पवना नदी सज्ज होणार आहे.