धुळे । तालुक्यातील जिल्हा परिषद कन्या शाळा रनाळ येथील उपक्रमशिल व आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापक अमृत पाटील यांना नुकताच राज्यस्तरीय जलदूत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. निसर्ग मित्र समिती, धुळे व डॉ.तुषार शेवाळे जलसमृद्धी प्रतिष्ठान, मालेगांव यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी राज्यात पाणी आडवा-पाणी जिरवा जलसंवर्धनाच्या कामात विशेष योगदान देणार्या व्यक्तींना राज्यस्तरीय जलदूत पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. शाळेच्या माध्यमातून मुख्याध्यापक अमृत पाटील यांनी पाणी आडवा-पाणी जिरवा, पाणी बचतीचे महत्त्व, व शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानातील सहभाग घेत काम केले. प्रचार व प्रसारासाठी केलेल्या योगदानाबद्दल धुळे येथील कल्याण भवनात दि.21 एप्रिल रोजी झालेल्या राज्यस्तरीय जलपरिषदेत आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या हस्ते अमृत नामदेव पाटील यांना सपत्नीक राज्यस्तरीय जलदूर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी परिषदेचे अध्यक्ष रामचंद्र पाटील, निसर्ग मित्र समितीचे संस्थापक प्रेमकुमार अहिरे, प्रदेशाध्यक्ष डी.आर.पाटील, डॉ.तुषार शेवाळे, शिक्षण सहसंचालक दिलीप गोविंद आदी उपस्थित होते.