जलपातळी खालावल्याने शेतकरी हवालदिल

0

तर्‍हाडी । शिरपूर तालुक्यातील तर्‍हाडी, ममाणे, अभानपूर या परिसरात रोजच्या रोज वाढत असलेल्या तापमानामुळे व कमी पावसाळा झाल्यामुळे कुपनलिकांची पातळी खालावली आहे. तर काही कुपनलिका बंद पडल्या आहेत. एकेकाळी समृद्ध असणार्‍या या भागात गेल्या, दोन, तीन वर्षापासून कमी झालेल्या पावसामुळे कुपनलिकांची भूजलपातळी खालावली आहे. कुपनलिका बंद पडल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

धरणातील पाणीसाठाही संपला
शेतकर्‍यांनी कर्ज, व्याजाने पैसे घेऊन उन्हाळी भुईमूग व कांद्याची लागवड केली आहे. दोन महिन्यांची पिके झाली व अचानक भूजल पातळी खालावल्याने पिकांना पाणी कसे द्यायचे या यक्ष प्रश्‍न शेतकर्‍यांपुढे उभा राहिला. कमी झालेल्या पाण्यामुळे पिके अक्षरशः वाया गेली आहेत. शेतकर्‍यांचा खर्च देखील निघत नाही आहे. त्यामुळे शेतकरी हा कर्जबाजारी होत आहे. कमी झालेल्या पावसाळ्यामुळे अभानपूर धरणातील पाणीसाठा हा जवळपास संपण्यात आला आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा न झाल्यामुळे कुपनलिका बंद पडत आहेत. वाढत्या तापमानामुळे कुपनलिकांची पातळी खालावली आहे. सुरवातीस कुपनलिकांत असलेल्या मुबलक पाणी असल्यामुळे शेतकर्‍यांनी पिक पेरा चांगल्या प्रमाणात केला. मात्र सद्या भरण करणेचे पुरेशे नसल्यामुळे शेतकरी पीक वाचविण्यासाठी धडपड करतांना दिसत आहेत.