नंदुरबार। जलयुक्त शिवार अभियान अत्यंत महत्वकांक्षी कार्यक्रम असून या अभियानात लोकसहभाग अत्यंत महत्वाचा आहे. खोकराळे, कवळीथ बंधारा येथील लोकसहभागातून झालेल्या कामांची मांडणी करून ते म्हणाले की, हे अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रतिनिधींचे प्रशिक्षण होणे गरजेचे आहे. ज्या गावातील प्रतिनिधींचे प्रशिक्षण होणार नाही, त्या गावाला हे अभियान राबविता येणार नाही अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केल्यात. ते डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्र, येथे आयोजित जलयुक्त शिवार अभियानासाठी निवडलेल्या गावातील प्रतिनिधींचे तीन दिवसीय प्रशिक्षणाचा समारोपप्रसंगी बोलत होते.
सक्रीय सहभागाचे आवाहन
या प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी मधुकर पन्हाळे यांचे हस्ते करण्यात आले. जलयुक्त अभियान ही चांगली योजना असून गावकर्यांनी सक्रीयपणे सहभाग घेवून जलसंधारणाचे कामातून पाणी निर्माण करावे, त्यातूनच शेतीचा शाश्वत विकास साध्य होईल असे प्रतिपादन पन्हाळे यांनी केले. यावेळी या प्रशिक्षणाचे समन्वयक कृषि विज्ञान केंद्राचे जयंत उत्तरवार यांनी प्रास्ताविक केले तर आभार तालुका कृषि अधिकारी नरेंद्र महाले यांनी मानले.
दोन टप्प्यात प्रशिक्षण
नंदुरबार तालुक्यातील 21 गावांची 2017-18 वर्षातील जलयुक्त शिवार अभियानाच्या अंमलबजावणीसाठी निवड झालेली आहे. या गावांचे दोन टप्प्यात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. जलयुक्त शिवार अभियानासाठी निवड झालेल्या प्रत्येक गावातील 5 प्रतिनिधी या प्रशिक्षणासाठी निवडण्यात आले. यात सरपंच, ग्रामसेवक व कृषि सहाय्यक हे पदसिद्ध प्रतिनिधी आहेत. ग्राम कार्यकर्ता, शेतीमित्र, जलसेवक, प्रगतीशील शेतकरी यापैकी दोन सदस्य असे पाच जणांचे प्रशिक्षण होत आहे. यात एक महिला सदस्य असावी असा आग्रह आहे.
10 गावांतील प्रतिनिधींचा सहभाग
10 गावातील प्रतिनिधींचे प्रशिक्षण कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार येथे आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये जल व मृद संधारणाचे महत्त्व, जल व मृद संधारणाचे विविध उपचार, मूलस्थानी जलसंधारण यासोबतच जलयुक्त शिवार अभियान, अंमलबजावणी विविध यंत्रणांचा सहभाग, गावांचे पाण्याचे अंदाजपत्रक तयार करणे, गावाचा आराखडा तयार करणे या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
यांनी केले मार्गदर्शन
करणसिंग गिरासे, संजय तांबोळी, रतीलाल महाले, मनरेगाचे काथेपुरी, जितेंद्र धगधगे, जयप्रकाश बागडे, जयंत उत्तरवार यांनी मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणार्थ्यांचे गट पाडून गटशी चर्चा तसेच जलयुक्त अभियानावरील चित्रफीती दाखविण्यात आल्या. यशस्वी आयोजनासाठी उपविभागीय कृषि अधिकारी रमेश शिंदे, तालुका कृषि अधिकारी नरेंद्र महाले, कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख राजेंद्र दहातोंडे, विषयतज्ञ जयंत उत्तरवार, जिल्हा प्रशिक्षण समन्वयक ज्ञानेश्वर बावीस्कर यांनी सहकार्य केले.