जुन्नर । जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत पादीरवाडी-वडगाव परिसरात झालेल्या विविध विकासकामांची जुन्नर-आंबेगावचे उपविभागीय अधिकारी अजित देशमुख यांनी नुकतीच पाहणी केली.
पादीरवाडी येथील गावतळे व मोरदा पाझर तलावाची देशमुख यांनी पाहणी केली. पाणी आडवा पाणी जिरवा ही संकल्पना यशस्वीपणे राबविल्याबद्दल त्यांनी ग्रामस्थांचे कौतुक केले. दरम्यान, पिंपळगाव जोगा कालव्यातून पाईप लाइनद्वारे पाणी उचलून पादीरवाडी येथील गावतळ्यात सोडण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली फिनोलेक्स कंपनीच्या सीएसआर फंडातून पाईप उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याचे सामाजिक कार्यकर्ते डी. बी. वाळुंज यांनी सांगितले. तसेच फिनोलेक्स कंपनीचे उपाध्यक्ष बी. आर. मेहता यांना गावभेटीचे निमंत्रण दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, अजित देशमुख यांनी वडगाव आनंद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सुविधा पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. तलाठी रोहिदास वामन, सुरेश शिंदे, वैशाली देवकर आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.