जलयुक्तमध्ये सुमारे 25 लाखांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार

0

नंदुरबार । जलयुक्त शिवार योजनेच्या कामात अनियमितता असल्याचे सांगत स्वतः कृषी कर्मचार्‍यानेच चौकशी करण्याची मागणी शासनाकडे केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे अधिकारी -ठेकेदार संशयाच्या भोवर्‍यांत सापडणार असून याची सखोल चौकशी झाल्यास अनेक यंत्रणेवर कारवाईची टांगती तलवार राहणार आहे. नंदुरबार या आदिवासी बहुल जिल्ह्यात शेकडो कोटी रूपयांचा खर्च होतो. परंतु, या योजनांमध्ये कालंतराने भ्रष्टाचार झाल्याचे चित्र दिसून येते. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून जलयुक्त शिवार अभियानाची 4 हजार 872 कामे मंजूर आहेत. त्यावर सुमारे 135 कोटी रूपये खर्च अपेक्षीत आहे.

नवापूर तालुक्यातील कामांची चौकशी
कृषी परीवेक्षक उमेश भाणे यांनी ही तक्रार कृषी आयुक्त, विभागीय कृषी संचालक, जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी शासनाच्या या यंत्रणेकडे केली आहे. याबाबत मंगळवार 24 एप्रिल रोजी कृषी अधिक्षक कार्यालयात जिल्हा कृषी अधिक्षक, पन्हाळे यांच्यासोबत यंत्रणेची बैठक होवून चर्चा झाली. भदाणे यांनी केलेल्या तक्रारीच्या चौकशीसाठी एक समिती नेमण्याची घोषणा केली आहे. या समितीमार्फेत नवापूर तालुक्यातील 10 टक्के कामांची चौकशी करण्यात येणार आहे. यात दोषी आढळणार्‍या अधिकारी-कर्मचारी यांच्यावर कारवाईसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाणार असल्याचे जिल्हा कृषी अधिक्षक पन्हाळे यांनी सांगितले. 15 मेपर्यंत ही कारवाई अपेक्षित असल्याने जलयुक्त शिवार अभियान या योजनेच्या प्रत्येक कामांवर आता संशयाची पाल चुकचुकायला लागली आहे.

दोघांची मिलीभगत
कृषी परीवेक्षकाने खतगाव गावाच्या बिटमध्ये सुमारे 25 लाख रूपयांची कामे झाल्याचा देखावा करण्यात आल्याचा नमुनासादर केला आहे. त्याची तपासणी न करताच ठेकेदारांना बिले अदा करण्याचा भोंगळ कारभार यंत्रणेने केला आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न करता अनुदान देण्यास भाग पाडणे, मजूर सोसायटी व ठेकेदारांवर मंडळ अधिकार्‍यांनी मेहरनजर करून नियमबाह्य मुदत वाढवून घेणे आदी कारनामे सुरू आहेत.