जलसंधारण मंत्री राम शिंदे यांचा विरोधकांवर आरोप; भूजल पातळी कायम राहल्याचा दावा
पुणे : जलयुक्त शिवार योजनेमुळे कमी पाऊस पडूनदेखील भूजल पातळी कायम राहण्यात यश आले असून राज्यातील 356 तालुक्यांपैकी 101 तालुक्यांच्या भूजल पातळीत वाढ झाली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने (जीएसडीए) 3 हजार 900 गावांतील सिंचन विहिरींच्या आधारावर सादर केलेल्या अहवालावरून संपूर्ण राज्याचे स्पष्ट होत नाही. त्यामुळे विरोधकांकडून जलयुक्त शिवार योजनेवर केली जाणारी टीका पोरकटपणाची आहे. तसेच श्रमदानातून जलसंधारणाची कामे केलेल्या नागरिकांच्या हातांचा व त्यांनी गाळलेल्या घामाचा अपमान करणारी आहे, असा आरोप जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी केला.
जलयुक्त शिवार महत्त्वाकांक्षी योजना
राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या जलयुक्त शिवार या योजनेसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र, त्यातून राज्याच्या पाणीपातळीत वाढ झाली नाही; या उलट पाणीपातळीत घट झाल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केली जात आहे. त्यावर राम शिंदे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन जलयुक्त शिवार योजनेमुळे वाढलेल्या भूजल पातळीबाबत माहिती दिली.
ग्रामीण भागात पाणीसाठा उपलब्ध
जलयुक्त शिवार योजनेचे यश स्पष्ट करताना शिंदे म्हणाले, 2017-18 वर्षात अघवा 84 टक्के पाऊस झालेला असताना 180 लाख मेट्रिक टन उत्पादन झाले होते. तर 2013-14 मध्ये 124 टक्के पाऊस पडूनही केवळ 138 लाख मेंट्रिक टन उत्पादन घेता आले होते. त्याचप्रमाणे यंदा दुष्काळ असूनही जलयुक्त शिवारमुळे ग्रामीण भागात पाणीसाठा उपलब्ध असल्याने ऑक्टोबर महिन्यात वीजेची मागणी 29 टक्क्यांनी वाढली असल्याचे महावितरणकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.
700 कोटी रुपयांची कामे श्रमदानातून
शिंदे म्हणाले, जलयुक्त शिवार योजना लोकांनी स्वाकारली असून त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. तब्बल 700 कोटी रुपयांची कामे श्रमदानातून झाली असून राज्यात एकूण 7 हजार 789 कोटी रुपयांची कामे झाली आहेत.मराठवाड्यासारख्या भागातही गेल्यावर्षापर्यंत 4.5 मीटरने भूजल पातळी वाढली होती. राज्यातील सोयाबीनच्या उत्पादकतेत 11.51 टक्के, मूग पिकात 1.18 टक्के, उडिद पिकात 2 टक्के आणि बाजरीच्या पिकात 8 टक्के वाढ दिसून येत आहे.
टँकरच्या संख्येत घट झाली
जलयुक्त शिवारची कामे झालेल्या गावातच पाणीपातळीत घट झाली असल्याचा विरोधांकडून केला जाणारा आरोप धादांत खोटा असून राज्यात 5 लाख 42 हजार कामे झाली आहेत. त्यामुळे राज्याची पिक उत्पादनात 45 टक्के वाढ झाली आहे. तसेच टँकरच्या संख्येत घट झाली असून सध्या राज्यात केवळ 1 हजार 45 टँकर सुरू आहेत. जलयुक्तची कामे झाली त्या ठिकाणचे शेतकरी समाधानी आहेत, असेही शिंदे म्हणाले.