धुळे । जलयुक्त शिवार अभियान हे शासनाचे महत्वाकांक्षी अभियान आहे. या अभियानास सर्व शासकीय यंत्रणेबरोबरच स्वंयसेवी संस्थांनी मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी केले आहे. दरम्यान, उपजिल्हाधिकारी, रोजगार हमी योजना कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, महाराष्ट्र रोजगार हमी योजनांतर्गत काम करणारे कंत्राटी कर्मचार्यांनी जमा केलेल्या 17 हजार रुपयांचा धनादेश उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांनी जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांचेकडे सुपूर्द केला. रोजगार हमी योजना कार्यालयातील कर्मचार्यांनी राबविलेल्या उपक्रमांबाबत सर्व अधिकारी व कर्मचार्यांनी जलयुक्त शिवार अभियानाकरिता दिलेल्या आर्थिक योगदानाचे जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनी कौतुक केले.
शिरपूर तालुक्यातील 23 गावांची निवड
शिरपूर जलयुक्त शिवार अभियान 2017-18 यात शिरपूर तालुक्यातील 23 गावांचा समावेश करण्यात आला असून यासाठी डॉ.जितेंद्र ठाकूर यांच्या प्रयत्नांना व सातत्याने केलेल्या पाठपुराव्यास यश मिळाले आहे. डॉ.जितेंद्र ठाकूर यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.दादा भुसे व जिल्हाधिकारी यांच्याकडे शिरपूर तालुक्यातील अधिकाधिक गावांचा समावेश जलयुक्त शिवार अभियानात करण्याची मागणी केली होती. यानुसार अर्थे बु॥, बोराडी, भामपूर, भटाणे, कुवे, भरवाडे, वाघाडी, दहिवद, निमझरी, वरझडी, नांदर्डे, सावेर, कमखेडा, प्र.अंबे, अंबे, फत्तेपूर फा,गधडदेव, मालकातर, असली, मांजरोद, हिंगोणीपाडा, हिरवखेडा, हिगाव या गावांचा समावेश जलयुक्त अभियानात करण्यात आला आहे. यातून लोकसहभागातून मोठ्याप्रमाणात शिरपूर तालुक्यात जलयुक्त कामे होणार आहेत.
शिरपुरात ठाकुर यांचा प्रयत्न
डॉ.जितेंद्र ठाकूर यांनी शिरपूर तालुक्यात अनेक गावांमध्ये पाण्याची समस्या भेडसावत असल्याचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांना सतत भेटी घेवून सांगितले. शिरपूर तालुका हा सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असल्याने अनेक नदी-नाले वाहतात. मात्र ते वाहणारे पाणी न अडवल्याने उन्हाळ्यात त्याची गरज भासते. मात्र पाणी न अडवल्याने या वाहणार्या पाण्याचा फायदा होत नसल्याचे अनेक शेतकर्यांनी जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य असलेल्या डॉ.जितेंद्र ठाकूर यांना सांगितले. जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत देखील डॉ.जितेंद्र ठाकूर यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले.
खात्यावर लोकवर्गणी जमा करा
विविध सामजिक उपक्रमात अग्रेसर असणारी मंडळे, लोकप्रतिनिधी व स्थानिक नागरिकांनी अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी लोकवर्गणीद्वारे मदत करुन सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. जलयुक्त शिवार अभियानासाठी मदत देणार्या संस्थांनी खालील खात्यावर लोकवर्गणी जमा करावी. भारतीय स्टेट बँक ,मुख्य शाखा, धुळे खात्याचे नाव – मुख्यमंत्री सहाय्यता निधी- जलयुक्त शिवार, खाते क्रमांक 35203831447, आयएफसी कोड डइखछ0000366 या खात्यात जमा करावी. निधीतून जलयुक्त अभियान अंतर्गत निवडण्यात आलेल्या गावांमधील कामे पूर्ण करुन भविष्यात जिल्ह्यामध्ये येणार्या संकटास आळा घालण्यासाठी अतिशय महत्वपूर्ण योगदान या लोकसहभागाद्वारे लाभेल, अशी अपेक्षाही जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनी व्यक्त केली.