‘जलयुक्त’ मध्ये लोकसहभाग हवा

0

धुळे। लोकभाग ही आपली संस्कृती आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून लोकसहभागाची संधी आपल्याला मिळाली आहे. प्रत्येक योजनेच्या यशस्वितेसाठी लोकसहभाग आवश्यकच असतो. त्यामुळे जलयुक्त शिवार अभियानातही लोकसहभाग महत्वाचा आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात सकाळी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत लोकसहभागातून गाळ काढण्यासाठी आयोजित लोकसहभाग कार्यशाळेत जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे (रोहयो), उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ (धुळे), नितीन गावंडे (शिरपूर), जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. ए. बोटे यांच्यासह विविध संस्था, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायतींचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अभियानामुळे शाश्वत जलसाठा निर्मिती
डॉ. गुंडे म्हणाले, आपला पाणीप्रश्न आपाल्यालाच सोडवावा लागणार आहे. त्यामुळे गावकर्‍यांनी पडणारा पाऊस गावातच अडविला पाहिजे. त्यासाठी शेततळ्यांची निर्मिती करीत पाणी अडवावे. पाझर तलावातील सुपीक गाळ काढून तो शेतात टाकावा. त्यामुळे जमीन सुपीक होईल. या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी आवाहन केले. श्री. सांगळे म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानामुळे शाश्वत जलसाठा निर्माण होवून तो शेतकर्‍यांना लाभदायी ठरत आहे. शेतकर्‍यांनी आता पीक पध्दती बदलत शेतीत नव्या तंत्रज्ञानाचा वापर करावा. सूक्ष्म सिंचन, बी- बियाणे रासायनिक खते याविषयांवर कंपन्यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करावे. तसेच 15 मे नंतर गावागावात जावून उन्नत शेती- समृध्द शेतकरी अभियान राबविण्यात येईल, असे सांगत जलयुक्त शिवार अभियानासाठी कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी एक लाख रुपयांचा निधी देतील, असे सांगितले.

निधीबरोबरच लोकसहभाग महत्वाचा
जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे म्हणाले, जलयुक्त शिवार अभियान दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी महत्वाकांक्षी उपक्रम आहे. त्याचे चांगले परिणाम जिल्ह्यासह राज्यभरात दिसून येत आहेत. या अभियानासाठी शासनाकडून मिळणार्‍या निधीबरोबरच लोकसहभाग महत्वाचा आहे. स्वयंस्फूर्तीने काही जणांनी जेसीबी, ट्रॅक्टर तसेच निधी देण्याचे जाहीर केले आहे. त्यामागील जिव्हाळा, भावना महत्वाच्या आहेत. या अभियानासाठी आपण कशाप्रकारे योगदान देवू शकतात याविषयी सूचना केल्यास त्यांचे स्वागतच आहे. श्री सिध्दी विनायक ट्रस्ट यांच्याकडून एक कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. चांगले काम होत असल्यानेच मदतीसाठी अनेकजण पुढे येत आहेत. गावागावांत जावून जलयुक्त शिवार अभियानातील लोकसहभागाबाबत चर्चा करीत या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनी केले.

उत्कृष्ट कामाच्या चित्रफिती
यावेळी भारदे म्हणाल्या, जलयुक्त शिवार अभियानात सहभाग नोंदविणार्‍या स्वयंसेवी संस्था, संघटनांचे काम कौतुकास्पद आहे. त्याचबरोबर लोकसहभागही महत्वाचा आहे. . या अभियानातून स्वेच्छेने जेसीबी मशीनसह यंत्रसामग्री उपलब्ध करुन द्यावी, असेही त्यांनी आवाहन केले. यावेळी बापू खलाणे, मुकुंद कोळवले, विजय चांडक, कमर शेख, संजय शर्मा, उत्तमराव पाटील, रावसाहेब गिरासे, उत्तम निंबा देशमुख, पृथ्वीराज पाटील, जिल्हा परिषद सदस्या लीला सूर्यवंशी, रत्ना पाटील, भूषण पाटील, अजय राजपूत, विजय भामरे, संजय मोरे आदींनी मनोगत व्यक्त करीत आवश्यक ती यंत्रसामग्री व निधीबाबत सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले.