राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष अमित बच्छाव यांचा सवाल
पिंपरीः शासनाकडून विविध जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वांत मोठा जलयुक्त शिवार घोटाळा झाला असल्याचा अहवाल कृषी आयुक्तांना सादर करण्यात आला होता. बीडजिल्ह्यामध्ये करोडो रूपयांचा भ्रष्टाचार होऊ शकतो तर संपूर्ण महाराष्ट्रात किती भ्रष्टाचार झाला असेल, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी केला आहे. याबाबत अमित बच्छाव यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनात वरील उल्लेख करण्यात आला आहे.
जलयुक्त शिवार अभियानाची सुरूवात
या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शेतकर्यांच्या वाढत्या आत्महत्या, कृषी क्षेत्राचे नाकारात्मक विकासदर, जनावरांचा चारा प्रश्न, वाढते स्थलांतर, उद्योगधंद्याची वाताहात, शेतीवर आधारित असून उद्योगधंद्याचा प्रश्न, वाढती बेकारी आदी प्रश्नांवर मात करण्यासाठी जलसिंचन हा उत्कृष्ट पर्याय पुढे येतो. या विचाराची कास धरून शासनाने सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र – 2019 हा उपक्रम हाती घेतला. पाण्यावर कायम स्वरूपी मात करण्यासाठी एकात्मिक पद्धतीने नियोजनबद्धरित्या कृती आराखडा तयार करून 2015 रोजी जलयुक्त शिवार अभियानाची सुरूवात केली. परंतु प्रत्यक्षात मात्र सदर योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे दिसून येत आहे.
यंत्रणाच पोखरलेली आहे
राज्य सरकारतर्फे जलयुक्त शिवार योजना अंमलात आणण्याचा गाजावाजा केला जात असला, तरी ज्या पद्धतीने ही योजना राबवली जात आहे, त्यामुळे ही योजना जलयुक्त नव्हे परंतू जलमुक्त योजना होते की काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे ना खाऊँगा,ना खाने दूँगा अशा घोषणा द्यायचे व दुसरीकडे खाणार्यांना पोसायचे हे धोरण शासनाने अवलंबिले आहे. भ्रष्टाचाराने पोखरलेली यंत्रणा यामुळे सामान्य जनतेला नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ज्या ज्या जिल्ह्यात ही योजना राबविण्यात आली असेल त्या कामांची चौकशी करण्यासाठी शासनाकडून चौकशी समिती नेमण्यात यावी, अशी मागणीही बच्छाव यांनी केली आहे.