यवत । जलयुक्त शिवार योजना महाराष्ट्रात यशस्वी झाली आहे. केंद्र सरकारनेही या योजनेची दखल घेतली आहे. दौंड तालुक्यामध्ये आतापर्यंत 2.5 कोटी जलयुक्त शिवार योजनेसाठी मंजूर केले आहेत आणि अधिक निधी मंजूर केला जाईल. तसेच दौंडच्या सर्व प्रश्नांबाबत सरकार सकारात्मक विचार करेल, असे आश्वासन जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिले.मळद येथे जिल्हा परिषदेच्या वतीने जलयुक्त शिवार योजनेतून 67 लाख 87 हजार खर्च करून 20 एकरमध्ये 128.36 पाणी साठवणूक क्षमता असलेला साठवणूक तलाव बांधण्यात आला आहे. या तलावाचे जलपूजन आणि लोकार्पण जलसंधारणमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
खडकवासला कालव्यासाठी नवीन धोरण
दौंड तालुक्याला 2.5 कोटी रुपये जलयुक्त शिवार योजनेसाठी शिंदे यांनी मंजूर करून दिले. तसेच पुढील निधी लवकरच मंजूर करण्यात यावा अशी मागणी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी यावेळी केली. तसेच मागील सरकारने शेतकरी कर्जमाफी केंद्राने केली होती, चालू वर्षी शेतकरी कर्जमाफी राज्य सरकारने केली आहे. या कर्ज माफीची प्रक्रिया एका महिन्यात पूर्ण करावी, तसेच जलयुक्त शिवार योजनेत काही समस्या निर्माण होत असल्याने काही नियमात बदल करावेत. दरम्यान हवेली, दौंड, इंदापूर तालुक्याला वरदान लाभलेल्या खडकवासला कालवा खूप जुना झाल्याने 70 टक्के पाणी गळती होते, त्यामुळे या कालव्याबाबत नवीन धोरण तयार करून हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणीही कुल यांनी केली.
7 एकरामध्ये 3 महिन्यांपासून पाणी
साठवणूक तलावाचे सर्वेक्षण व मोजणी योग्य प्रकारे न झाल्यामुळे तलाव पूर्ण क्षमतेने पाणी आल्यानंतर तलावालगत असलेले 7 एकर पिकामध्ये तीन महिन्यांपासून पाणी गेले आहे. याबाबत संबंधित शेतकर्यांनी सर्व अधिकार्यांना लेखी निवेदन आणि तक्रार दिली आहे. यावेळी सर्व शेतकर्यांनी शिंदे यांना लेखी निवेदन दिले. नुकसान भरपाई त्वरित मिळावी, संबंधित जिल्हा परिषद अधिकार्यांना शेतकर्यांच्या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढला जावा, प्रशासकीय अधिकारी योग्य दखल घेत नसल्याने आम्हा शेतकर्यांना योग्य तो न्याय मिळून द्यावा, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली. यावेळी संबंधित अधिकार्यांना सर्व प्रकरण पुन्हा तपासणी करून शेतकर्यांना योग्य ती नुकसान भरपाई देण्यात येईन असे तोंडी आश्वासन शिंदे यांना शेतकर्यांना दिले आहे.
शेतकर्यांचा सत्कार
तलावासाठी जमीन देणार्या शेतकर्यांचा सत्कार करण्यात आला. आमदार राहुल कुल, तहसिलदार बालाजी सोमवंशी, जिल्हाअध्यक्ष विश्वासराव देवकाते, मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे कुरकुंभचे सरपंच जयश्री भागवत, मळदचे सरपंच महेश रणवले, वासुदेव नाना काळे, राहुल शितोळे, मनोज फडतरे, तानाजी दिवेकर, इतर पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.