मुंबई । राज्यात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून तीन वर्षांत 16 हजार 521 गावांची निवड करण्यात आली त्यापैकी 11 हजार 247 गावे जलपरिपूर्ण झाली असून उर्वरित गावे जून 2018 अखेर पूर्ण करावीत. पुढील वर्षासाठी निवड करण्यात आलेल्या 6200 गावांमध्ये कामे तातडीने सुरु करावीत. राज्यात 76 हजार 106 शेततळ्यांचे काम पूर्ण झाले असून 77 हजार विंधन विहिरींचे काम प्रगतीपथावर आहे ते पूर्ण करण्यासाठी त्याला गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, विंधन विहिरी, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई व शबरी घरकुल योजनांचा आढावा घेतला.
11 हजार 247 गावे जलपरिपूर्ण
गेल्यावर्षी निवडण्यात आलेली 5031 गावे जून 2018 अखेरपर्यंत जलपरिपूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करावे. नागपूर, वर्धा, नंदूरबार, उस्मानाबाद, चंद्रपूर, भंडारा, सिंधुदुर्ग, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये योजनेचे काम 80 टक्क्यांपेक्षा जास्त झाले असून जेथे काम अपूर्ण आहे तेथे अधिक लक्ष देऊन वेळेत पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी प्रयत्न करावा. यासंदर्भात आढावा घेण्यासाठी पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा एकदा बैठक घेऊन आढावा घ्यावा, असे ते म्हणाले.