जलयुक्त शिवारामुळे पाणी पातळीत वाढ होण्यास मदत

0

जळगाव । शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम असलेल्या जलयुक्त शिवार अभियानातंर्गत गावांमध्ये होत असलेल्या विविध कामांमुळे गावांची पाणी पातळी वाढण्यास मदत होत आहे. या अभियानाचा शेतकर्‍यांना चांगल्याप्रकारे लाभ होत असून शेतकर्‍यांना आपल्या पडीक जमिनीतही पीक घेता येत असल्याने शेतकर्‍यांचा आर्थिकस्तर उंचावण्यास निश्‍चितपणे मदत होत असल्याचे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानातील टप्पा तीनच्या (सन 2017-18) कामांचा शुभारंभ जळके, ता. जि. जळगाव येथे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आला यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मृद व जलसंधारण, रोजगार हमी योजना विभागाचे सचिव एकनाथ डवले हे उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, उपविभागीय कृषि अधिकारी पंकज लोखंडे, गटविकास अधिकारी, श्रीमती शंकुतला सोनवणे, तालुका कृषि अधिकारी विजय भारंबे, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, जळकेच्या सरपंच सिंधु पाटील, उपसरपंच राजेंद्र पाटील यांचेसह विविध शासकीय विभागांचे अधिकारी, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

अभियानातंर्गत जिल्ह्यात मोठया प्रमाणात कामे झाली
यावेळी बोलतांना राज्यमंत्री श्री. पाटील म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियानातंर्गत जिल्ह्यात मोठया प्रमाणात कामे झाली आहे. विशेषत: नाला खोलीकरणाच्या कामांमुळे गावांची पाणी पातळी वाढण्यास मदत झाली आहे. पाण्याच्या पातळीत झालेल्या वाढीमुळे शेतकर्‍यांना आपल्या पडिक जमिनीवर सुध्दा पीक घेता येत असल्याने त्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे. मृद व जलसंधारण विभागाचे सचिव श्री. डवले म्हणाले की, राज्यात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून मोठया प्रमाणात कामे होत आहे. या अभियानात मागील दोन वर्षात राज्यातील 11 हजार गावांची निवड करण्यात आली आहे. तर यावर्षी 5032 गावे निवडण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातही जलयुक्त शिवारची कामे मोठया प्रमाणात झाली आहे. या कामांमुळे गावे स्वयंपूर्ण होण्यास मदत होत आहे. या अभियानाच्या माध्यमातून गावांमध्ये शाश्‍वत सिंचन निर्माण करण्यावर भर देण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस राज्यमंत्री गुलाबराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते जलयुक्त शिवार अभियानात ग्रामस्थांनी गावासाठी तयार केलेल्या जल आराखड्याच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. त्याचबरोबर गावात मागीलवर्षी जैन फाउडेशन, आर्ट ऑफ लिव्हिंग तसेच ग्राम सहभागातून करण्यात आलेल्या नाला खोलीकरणाच्या कामाची तसेच मागेल त्याला शेततळे योजनेतंर्गत सन 2016-17 मध्ये जळके येथे तयार करण्यात आलेल्या शेततळ्याची मान्यवरांनी पाहणी केली. ही कामे बघून उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केले. तसेच शेततळयात साठविण्यात आलेल्या पाण्यामुळे उन्हाळ्यापर्यंत केळी पीकास पाण्याची टंचाई भासणार नसल्याचे उपस्थित शेतकर्‍यांनी सांगितले.

जलसंधारण सचिवांची जळके ग्रामपंचायत कार्यालयास भेट
यावेळी मृद व जलसंधारण, रोजगार हमी योजना विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी जळके ग्रामपंचायत कार्यालयास भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी गावांत सुरु असलेली कामे, कामांचा दर्जा आदिबाबत गावकर्‍यांशी चर्चा केली. यावेळी ग्रामपंचायतीच्यावतीने कृषिभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी राजेश पाटील यांनी श्री. डवले यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच ग्रामस्थांची देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी योजनेबाबात माहिती देखील देण्यात आली.