मंदाणेे परिसरातील कामांच्या लेखा परीक्षणाची मागणी
नंदुरबार । तालुक्यातील पूर्व भागातील मंदाणेे येथे मागील 3 ते 4 वर्षांपूर्वी शासनाने लाखो रुपये खर्च करून राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियान कामांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. परिसरात पशुपालक, शेतकरी व नागरिकांना पाण्याअभावी भीषण दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. म्हणून परिसरात लाखो रुपये खर्च करून शासनाने केलेल्या जलयुक्त शिवार अभियानाचा फज्जा उडाला आहे. म्हणून झालेल्या कामांचे स्ट्रक्चरल ऑडिट (लेखा परीक्षण) करण्याची मागणी होत आहे.
शहादा तालुक्यातील पूर्व भाग हा पाण्याअभावी दुष्काळी परिस्थितीने होरपळत आहे. परिसरात शेतकरी, पशुपालक व नागरिक मोठ्या प्रमाणावर चिंतातूर झाले आहेत. जनावरांना चारा, पिण्यासाठी पाणी, शेतीसाठी पाणी, प्रत्येक खेडोपाडी पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. मंदाणेसह परिसरात पाण्याच्या पातळी वाढविण्यासाठी व जलस्तर उंचावण्यासाठी शासनाने लाखो रुपये खर्च करून नदी-नाले खोलीकरण, सिमेंट बंधारे बांधकाम करणे व कूपनलिका करणे असे अनेक कामे राबविण्यात आली होती. या कामांमुळे मंदाणे व परिसरातील जलस्तर वाढणे गरजेचे होते. परंतु मागील काही वर्षात पावसाळा होऊनही दुष्काळी स्थिती निर्माण झाली, हे न उमजणारे कोडे आहे. म्हणून झालेल्या कामांचे लेखापरीक्षण होणे गरजेचे आहे.
मंदाणे येथील शेतशिवार भागातील कलमाडी शिवार, वडगाव शिवार, घोडलेपाडा शिवार, भोंगरा शिवार, तितरी शिवार, दुधखेडा शिवार अशा अनेक भागातील नाल्यांवर व लहान नदीवर अनेक सिमेंट बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यातील काही भागातील बंधारे मागील वर्षांपासून निरुपयोगी ठरले आहेत. बंधारे बांधून पाणी थांबले नाही, नदी-नाले खोलीकरण करून पाण्याची पातळी वाढली नाही. म्हणून जलयुक्त शिवार अभियान ही योजना निष्फळ ठरली की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरात पाण्याअभावी स्थिती खूपच चिंताजनक झालेली आहे. म्हणून झालेल्या कामांचे लेखा परीक्षण होणे गरजेचे आहे. त्यातून योजना निसर्गाने गिळंकृत केली की संबंधित ठेकेदारांनी हे लक्षात येईल आणि शासनाच्या झालेल्या निधीची हानी भरून काढण्यासाठी मदत होईल, म्हणून मंदाणे परिसरात झालेल्या संपूर्ण विभागाचे जलयुक्त शिवार अभियान कामांचे लेखा परीक्षण होणे गरजेचे झाले आहे.