जलयुक्त शिवार अभियानातील कामे लवकरात लवकर पूर्ण करा!

0

धुळे । जलयुक्त शिवार अभियानात सन 2017-18 मधील कामे संबंधित यंत्रणांनी लवकरात लवकर पूर्ण करावीत. तसेच 2018-19 मधील कामांची प्रशासकीय मान्यता 31 जुलैपूर्वी घेवून 31 ऑगस्टपर्यंत कामांचे कार्यादेश द्यावेत, अशा सूचना मृद व जलसंधारण व रोहयो विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी दिल्या. शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात जलयुक्त शिवार अभियान, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, मनरेगा अंतर्गत अपूर्ण विहिरींची कामे पूर्ण करणे आदी कामांचा आढावा सचिव एकनाथ डवले यांनी घेतला.

कामांच्या पूर्ततेवर भर द्यावा
सचिव श्री. डवले यांनी सांगितले, पावसाळ्यास सुरवात झाली आहे. अशा परिस्थितीत जलयुक्त शिवार अभियानात सहभागी यंत्रणांचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी संवेदनशील राहत कामांच्या पूर्ततेवर भर द्यावा. तसेच या अभियानासाठी सन 2018-19 मध्ये निवड केलेल्या गावांचे आराखडे, शिवार फेर्‍या आदी बाबी कालबध्द कार्यक्रमाप्रमाणे पूर्ण करावेत. तसेच या कामांसाठी 31 जुलैपर्यंत अंदाजपत्रक तयार करुन प्रशासकीय मान्यता घ्यावी. तसेच 31 ऑगस्टपर्यंत कार्यादेश द्यावेत. जेणेकरुन कामे जलदगतीने पूर्ण होण्यास मदत होईल. धुळे जिल्ह्यात फड पध्दतीची मोठी परंपरा आहे. या पध्दतीच्या माध्यमातून भूजल वाढण्यास मदत होईल. या फड पध्दतीच्या पुनर्जीवनासाठी कार्यक्रम हाती घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.

बंधार्‍यांच्या कामाची केली पाहणी
यावेळी सचिव श्री. डवले यांनी कृषी विभाग, वन विभाग, लघुसिंचन (जिल्हा परिषद), लघुसिंचन (जलसंधारण), धुळे पाटबंधारे विभाग, भूजल सर्वेक्षण विभाग, पंचायत समिती (नरेगा), सामाजिक वनीकरण आदींचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी सचिव श्री. डवले यांनी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, मनरेगाअंतर्गत अपूर्ण विहिरी पूर्ण करणे आदींचा आढावा घेतला. तत्पूर्वी सचिव श्री. डवले यांनी मुकटी, ता. धुळे परिसरातील येथे गॅबियन बंधारा व काँक्रिट रिचार्ज बंधार्‍याच्या कामांची पाहणी केली.

यांची होती उपस्थिती
यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी., जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, उपवनसंरक्षक जी.के. अनारसे, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ, नितीन गावंडे, जिल्हा कृषी अधिकारी पी.एम. सोनवणे, तहसीलदार अमोल मोरे, सुदाम महाजन, प्रशांत पाटील, लघुसिंचन (जलसंधारण) विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन दुसाने आदींसह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.