जलयुक्त शिवार अभियानात ग्रामस्थांचा सहभाग महत्वपूर्ण

0

जळगाव । गावाला दुष्काळ मुक्त करून जलस्वयंपूर्णतेकडे न्यायचे असेल तर जलयुक्त शिवार अभियानात ग्रामस्थांचा सहभाग महत्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. जलयुक्त शिवार अभियानात निवड झालेल्या गावामध्ये जी कामे करावयाची आहे. त्या कामांची निवड ही ग्रामस्थांनीच करायची असल्यामुळे या गावांमध्ये शिवार फेरीचे माध्यमातून ग्रामस्थांशी चर्चा करून गावाचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. धरणगाव तालुक्यातील जलयुक्त शिवार अभियानात सन 2017 -18 मध्ये निवड झालेल्या जांभोरा, बिलखेडा व भोणे या गावांमधे शिवार फेरी व शेतकरी सभेचे आयोजन करण्यात आले होते. या शिवार फेरीत स्वतः राज्यमंत्र्यांनी सहभाग घेतला. यावेळी बिलखेडा येथे झालेल्या शिवार फेरी कार्यक्रमात सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी ग्रामस्थांना जल व मृद संधारणाचे महत्व सांगितले. तसेच जास्तीत जास्त ग्रामस्थांनी जलयुक्त शिवार अभियानात उत्फुर्तपणे सहभाग घेण्याचे आवाहन केले.

अधिकार्‍यांना दिल्या कामांबाबत सूचना
शिवार फेरीच्या वेळी सर्व यंत्रणेच्या अधिकारी वर्गाने कामांची माहिती दिली. निवड झालेली ही सर्व गावे 2018 पर्यंत जलस्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टिने गाव आराखड्याची निर्मिती करण्याच्या सूचना राज्यमंत्री पाटील यांनी दिल्या. याप्रसंगी पंचायत समितीचे उपसभापती प्रेमराज पाटील, तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी, मंडळ कृषी अधिकारी किरण देसले, लघु सिंचन जलसंधारण (स्थानीक स्थर)चे अभियंता जोशी, लघु सिंचन जलसंधारण (जि.प.)चे अभियंता मोरे, वन विभागाचे क्षेत्रपाल तडवी, पंचायत समितिचे विस्तार अधिकारी मोरे आदि उपस्थित होते.