जलयुक्त शिवार कामांना प्राधान्य द्या

0

आमदार हरीभाऊ जावळे ; फैजपूरला पावसाळापूर्व आढावा बैठक

फैजपुर- प्रांत कार्यलयात शनिवारी आमदार हरिभाऊ जावळे यांनी पावसाळा पूर्व आढावा बैठक घेतली. आमदार जावळे यांनी उपस्थित सर्व अधिकार्‍यांना जलयुक्त शिवार व जलसंधारण कामांना प्राधान्यक्रम द्यावे अश्या सूचना उपस्थित अधिकार्‍यांना दिल्या. व्यासपीठावर प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, यावल पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी, रावेर पंचायत समिती सभापती माधुरी नेमाडे, यावल तहसीलदार कुंदन हिरे, रावेर तहसीलदार विजय ढगे यांची उपस्थिती होती.

बियाणे उपलब्ध करण्याच्या सूचना
या बैठकीत जलसंधारण व जलयुक्त शिवार यांची पावसाळ्यापूर्वी करावयाची कामे याबाबत अधिकार्‍यांसोबत चर्चा करण्यात आली तर ग्रामीण विभागात वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. कृषी विभागाकडून खरीप हंगामाचा आढावा घेण्यात आला व 20 तारखेपर्यंत शेतकर्‍यांना बियाणे उपलब्ध करून वाटप करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या तर बोगस बियाणे बाबतही कडक सुचना देण्यात आल्या. रावेर तालुक्यातील सहस्त्रलिंग, जानोरी, मोरव्हाल, गुलाबवाडी व यावल तालुक्यातील वड्री, भिलाली येथील पाझर तलाव दुरुस्तीची चर्चा झाली.

जलयुक्त शिवारात 28 गावांचा समावेश
यावेळी प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी जलयुक्त शिवारासाठी यावल तालुक्यातील 11 व रावेर तालुक्यातील 17 गावांची निवड करण्यात आल्याचे सांगत जनजागृतीसाठी शिवार शेतीचे आयोजन करण्याचे आवाहनही केले.

यांची होती उपस्थिती
या बैठकीला जिल्हा परीषद सदस्या सविता भालेराव, नंदा सपकाळे, यावल पंचायत समिती सदस्य योगेश भंगाळे, रावेर पंचायत समिती सदस्य योगीता वानखेडे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष विलास चौधरी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी यांच्यासह वनविभाग, कृषी, जलसंधारण, पाटबंधारे विभागासह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

विहिर पुर्नभरण योजनेसाठी मोर धरण परीसरात आमदारांची भेट
आढावा बैठक संपल्यानंतर आमदार जावळे यांनी सर्व अधिकार्‍यांच्या पथकासह मोर धरण परीसराला भेट दिली. नदी पात्रात आमदार निधीतून प्रायोगिक तत्वावर पाच विहिरी खोदण्यात येणार असून परीसरातील आठ ते दहा गावांचा पाण्याच्या प्रश्न सुटेल, अशी आशा व्यक्त करण्यात आली. यावेळी वरीष्ठ भूजल वैज्ञानिकचे व्ही.जी.जैन यांनी योजना यशस्वी करण्यासाठी परीसरातील माहिती जाणून घेतली. ही कामे येत्या सोमवारपासून सुरू होतील, असे आमदार जावळे यांनी सांगितले. यावेळी फैजपूर प्रांताधिकारी अजित थोरबोले, तहसीलदार कुंदन हिरे, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य मनोज वायकोळे, विलास चौधरी, हिरालाल चौधरी उपस्थित होते.