अमळनेर : जलयुक्त शिवार मध्ये उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल काल धुळे येथे अमळनेर तालुक्यास विभाग स्तरावर द्वितीय तर जिल्ह्यात प्रथम पुरस्कार जलसंधारण मंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. दरम्यान जलयुक्त च्या कामांसाठी हिरा उद्योग समूहाच्या आवाहनानुसार अनेक गावातून लोकसहभाग मिळाल्याने हा पुरस्कार जनतेला समर्पित असल्याची भावना आमदार शिरीष चौधरी यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आ चौधरी यांनी म्हटले आहे की अमळनेर तालुक्यास दुष्काळाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी जलयुक्त शिवारसाठी शासनाने चांगला निधी दिला व निधी कमी पडू नये म्हणून हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ रविंद्र चौधरी यांनी हिरा उद्योग समूहाचा सव्वा कोटी सीएसआर फंड उपलब्द करून दिला.
प्रत्यक्षात हिरा उद्योग समूहाच्या नालाखोलीकरण व रुंदीकरण उपक्रमास प्रत्येक गावातून उस्फूर्तपणे लोकसहभाग व मदत देखील मिळाली. यामुळेच जलयुक्त च्या कामास खर्या अर्थाने बळकटी मिळाली आहे. यामुळे या पुरस्काराचे खरी हक्कदार जनताच असल्याचे आमदार चौधरी यांनी सांगून त्यांना हा पुरस्कार समर्पित असल्याचे त्यांनी म्हटले आहे व शासनानेही भरघोस निधी दिल्याने मुख्यमंत्री यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.