जलयुक्त शिवार भाजपच्या बगलबच्यांसाठी पोषक

0

काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.राधेशाम चौधरी यांचा पत्रकार परिषदेत आरोप

जळगाव– ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर व्हावी व शेती शिवार सिंचनाखाली येवुन शेतकर्‍यांना आपली शेती, शिवार सुजलाम सुफलाम करता यावे, पाण्याचे दुर्भिक्ष दूर व्हावे या हेतुने महाराष्ट्र शासनाने जलयुक्त शिवार ही योजना 2015 पासुन मोठा वाजगाजा करत अंमलात आणली आहे. जिल्ह्यात दरवर्षी कोट्यावधीची कामे झाली. योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च करुन मुख्यमंत्र्यांनी काय साध्य केले. ठेकेदारांसाठी ही योजना राबवली का? कोट्यावधीची योजना फक्त भाजपचे कार्यकर्ते, नेत्यांचे बगलबच्चे पोसण्यासाठीच आहे का? असा सवाल उपस्थित होत असुन इतके कामे झाली मग जिल्हा भरात पाण्याची भिषण टंचाई कशी उद्भवल्याने ही योजना राज्याप्रमाणे जिल्ह्यातही फसवी ठरली असल्याचा आरोप काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.

प्रचारासाठी घिरट्या घालणार्‍या मंत्र्यांना वेळ नाही
वर्ष भरापासून या राज्याला पूर्ण वेळ अनुभवी कृषिमंत्री नाही, नऊ महिन्यापासून कृषी खात्याला सचिव नाही . कृषिप्रधान भारतात दुष्काळात देखील शेती, शेतकरी, मजूर किती दुर्लक्षित आहे ,याचे लाजिरवाणे उदाहरण म्हणजे सध्याचे फडणवीस सरकार गेल्या 2 वर्षांपासून जळगाव जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्याने यंदा भीषण दुष्काळ आहे. 1501 गावांपैकी जवळपास 1000 गावां पेक्षा जास्त मधील जनता व जनावरे पाण्याअभावी तडफडताय. प्रचंड हाल होत असताना राज्यकर्ते मात्र आपल्याच मस्तीत आहे. राज्याचे महसूल मंत्री व जळगावचे पालकमंत्री असलेले चंद्रकांत पाटील टंचाईची स्थिती जाणून घेण्यासाठी जिल्ह्यात महिनाभर फिरकलेल नाही. लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी जिल्ह्यात घिरट्या घालणार्‍या पालकमंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन व मुख्यमंत्र्यांना आता वेळ नाही. जनतेला त्यांनी वार्‍यावर सोडले आह, हे असले पालक काय कामाचे असेही डॉ. चौधरी यांनी यावेळी सांगितले.

काँग्रेसतर्फे निषेध, पालकमंत्र्यांनी शेतकर्‍यांची माफी मागावी
काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र दुष्काळी समितीने बाळासाहेब थोरात , डॉ सुधीर तांबे , संदीप भैय्या पाटील आदी नेत्यांच्या नेतृत्वात जिल्हाभर दौरे केलेत . काल चंद्रकांत पाटलांनी तीन तालुक्यातील नऊ गावांना धावत्या भेटी देऊन सोपस्कार पार पडण्याचे काम केले .त्यातही त्यांनी दुष्काळाने होरपळलेल्या जनतेच्या दुखावर फुंकर मारण्य ऐवजी पीककर्ज घेऊन एफ डी करणार्‍या शेतकर्‍यांची संख्या किती ? असे असंवेदनशील विधान करून जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले, काँग्रेस पक्षातर्फे त्यांचा आम्ही निषेध करतो .पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यावर शेतकर्‍यांची बिनशर्त माफी मागावी अशी मागणी करतो .

संकटमोचक महाजनांकडून बघ्याची भूमिका
जिल्ह्याला संकटाच्या वेळी ठाण मांडून बसणारा पालकमंत्री हवा, पर्यटनाचे सोपस्कार पार पडणारा बेफिकीर मंत्री नकोय, बारामतीत निवडणुकीसाठी ठाण मांडून बसणारे आता जळगावात का ठाण मांडून बसत नाहीत ? पिण्याचे पाणी, गुरांना चारा, हाताला रोजगार, फळ बागा वाचवणे, पिक कर्ज व दुष्काळी मदतीचे वितरण अशा सर्व उपाय योजनांत जिल्हा पिछाडीवर आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन राज्यभर संकटमोचकाची भूमिका पार पाडतात म्हणे मग त्यांना जळगाव जिल्ह्यातील भीषण टंचाई दिसत नाही का? आता पर्यंत त्यांनी जिल्ह्यात एक तरी टंचाई निवारणार्थ आढावा बैठक घेतली का? त्यांच्या जामनेर तालुक्यात टंचाईची काय परिस्थिती आहे, हे तरी त्यांना ठाऊक आहे का? गिरीश महाजन भाजपा सरकारचे, फडविसांचे संकटमोचक असतील, पण जळगावच्या जनतेला संकटात असतांना ते बघ्याची भूमिका कशी घेऊ शकतात ?

पालकमंत्र्यांकडून शेतकर्‍यांची क्रुर विटंबना
जळगाव जिल्हा बँकेकडून अद्याप फक्त 3 टक्के पिक कर्जाचे वितरण झाले आहे असे माध्यमातून समजते, जिल्हाभरात 2936 कोटींचे बँकांना टार्गेट असतांना आजवर फक्त 85 कोटींचे पिक कर्ज दिल्याचे समजते. 50 हजार शेतकरी ज्यांची नावे पात्र लाभार्थी यादीत आहेत. परंतु ऑनलाईन प्रक्रियेच्या लेखनिक चुकांमुळे त्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम वर्ग होत नाही .त्यामुळे पात्र असूनही, ती रक्कम खात्यावर जमा न झाल्यामुळे शेतकरी थकबाकीदार दिसतोय .हा घोळ किती दिवस चालेल ? संकटात सापडलेल्या शेतकर्‍याच्या ह्या क्रुर विटंबनेस जबाबदार कोण? जर पावणे दोन वर्ष उलटून हि 50 हजार शेतकर्‍यांना कर्ज माफीचा फायदा त्यांच्या खात्यात जमा झालेला नसेल, तर याला जबाबदार कोण .पालकमंत्री या सर्व घोळाला जबाबदार आहेत, त्यांनी हि जबाबदारी स्वीकारली पाहिजे. राज्यकर्त्यांना जनतेक दुख पाहून डोळ्यात अश्रू आले पाहिजेत. त्या ऐवजी पालकमंत्री बेफिकीर विधाने करत असल्याचेही यावेळी डॉ. राधेशाम चौधरी म्हणाले.