जलयुक्त शिवार योजनेचा बोजवारा

0

वरणगाव । शासन स्तरावरुन मुख्यमंत्री प्रणीत जलयुक्त शिवार योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देण्यासंदर्भात शासण अंतर्गत अतोनात प्रयत्न केले जात आहे. या माध्यमातून शेतकर्‍यांच्या कोरडवाहु शेतांना व विहीरींना मुबलक पाणि उपलब्ध व्हावे संकटात येणारा शेतकरी समाधानी व्हावा या दृष्टीकोणातुन जलयुक्त शिवार योजनेला महत्व झाले असुन, त्याकरीता शासन कोट्यावधी रुपयांचा उपलब्ध करुन देत आहे. मात्र शासनाचेच प्रशासकीय अधिकारी योजनेचा संपूर्ण तालुक्यात बोजवारा उडवितांना दिसत आहे. मुख्यमंत्री अखत्यारीत संपूर्ण महाराष्ट्रात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत लहान मोठ्या नदी, नाले, ओंढ्यांवर बंधारे बांधण्याचे काम मोठ्या प्रमाणात भरघोस निधी उपलब्ध करुन सुरू आहे.

या गावांची बंधारे बांधकामाची कामे करण्यात आली सुरु
मात्र जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात जिल्हा परिषदेच्या पाटबंधारे विभागामार्फत गोभी, सुनसगाव, सिंधी, कुर्‍हापानाचे, खेडी, शिरपुर कन्हाळा, फुलगाव, कठोरा, अजनसोंडा, तळवेल, जाडगाव, मन्यारखेडा, बोहर्डी आदी गावाच्या शिवारात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत बंधारे बांधकामाचे कामे सुरु करण्यात आले आहेत. मात्र खेडी या गावालगत असलेल्या नाल्यावर लाखो रुपये खर्च करुन बंधारा बांधण्यात येत असून या ठिकाणी माती मिश्रीत वाळु, वाळुऐवजी फपुटा मिश्रीत कच, निकृष्ठ दर्जाचे सिमेट, दगड गोट्यांमध्ये पायाभरणी व खडीऐवजी विहीरीवरील खोदकामाचे दगड आदी साहित्याचा वापर करुन बांधकाम केले जात आहे

राजकीय खेळीमुळे बंधार्‍याचे काम निकृष्ठ
अशाच प्रकारे गोभी शिवारातील नाल्यावर एका प्रतिष्ठीत राजकीय प्रतिनिधीने बांधकामाचा मक्ता घेवुन निकृष्ठ दर्जाचे बांधकाम केल्याने त्याच पक्षाच्या दुसर्‍या लोकप्रतिनिधीने या बांधकामावर हातोडा चालवून स्वतः तोडल्याने दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली होती सदर प्रकरण वरीष्ठांपर्यंत पोहचल्याने दोघांमध्ये समजोता करण्यात आला. मात्र या राजकिय खेळीमुळे बंधार्‍याचे काम निकृष्ठच राहीले तर नाव न सांगण्याचे अटीवर एका लोकप्रतिनिधीने तळवेल आचेगाव रस्त्यावर भोगावती नदीवरील बंधार्‍यांचे खोलीकरण न करता तसेच बोहर्डी शिवारातील वरणगाव-मुक्ताईनगर महामार्गालगत हॉटेल सहेलीजवळील नाल्यातील बंधार्‍यांचे खोलीकरणाचे काम प्रत्यक्ष न करता कागदोपत्री दाखवुन परस्पर या दोघ कामांचे प्रत्येकी तीन-तीन लाख असे एकुण सहा लाख रुपयांचे बील काढण्यात आले आहे, अशी माहिती या लोकप्रतिनिधीने दिली.

उडवाउडवीची दिली जातात उत्तरे
या घटनेची माहिती जाणुन घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे पाटबंधारे विभागाचे अभियंता गुरव यांच्याशी भ्रमणध्वणीद्वारे संपर्क साधून माहिती विचारली असता माहिती घेतो, अधिकार्‍यांशी बोलतो, कामाठिकाणी भेट देतो, अशी उडवाउडवीची असमाधन कारक उत्तरे दिली. त्यांनतर दुसर्‍या दिवशी सदर सहेली हॉटेलजवळील बंधार्‍याच्या खोलीकरणाचे काम सुरु करण्यात आले. या सुरु असलेल्या कामाची अभियंता गुरव यांना भ्रमणध्वणीवरुन माहिती दिली असता पुन्हा उडवाउडवीची उत्तरे दिल्याने जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता नाईक यांच्याशी भ्रमणध्वणीवरुन संपर्क साधला असता त्यांचा व मुक्ताईनगरचे अभियंता आर.बी. चौधरी यांचा फोन पुढील दोन दिवस बंदच आढळुन आला.

करोडो रुपयांची होतेय लूट
तसेच सदर खोलीकरणाचे कामही तात्काळ बंद करण्यात आल्याने शंका प्रतिशंकांना खतपाणी मिळत आहे. यामुळे जिल्हा परिषद पाटबंधारे विभागातील अधिकार्‍यांची साखळी असल्याची या घटनेवरुन दिसुन येत आहे. यामुळे शासनाच्या करोडो रुपये निधीचा प्रशासकीय अधिकारी लुट करीत असल्याची शेतकर्‍यांमध्ये चर्चा आहे.