जलयुक्त शिवार योजनेच्या अंमलबजावणीसाठी यंत्रणा उभारणार

0

मुंबई – राज्यात जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी एक यंत्रणा तयार करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी गुरुवारी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

जलयुक्त शिवार योजनेतला निधी अखर्चित राहिल्याबाबत भाजपाचे परिणय फुके यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. पाऊस आणि आचारसंहितेमुळे काही कामे उशिराने सुरू झाल्यामुळे मार्च अखेरपर्यंत २१ कोटी १४ लाख रुपयांचा निधी शिल्लक राहिला. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत राज्यात गेल्या वर्षी वीस हजार पंधरा कामे हाती घेण्यात आली. त्यापैकी तेरा हजार पाचशे ब्याऐंशी कामं पूर्ण झाली आहेत. सहा हजार चारशे तेहतीस कामे प्रगतीपथावर आहेत, अशी माहिती मंत्री शिंदे यांनी दिली.

या चर्चेदरम्यान कोकणावर अन्याय होत असल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना राम शिंदे यांनी कोकणातल्या जानवली, जगबुडी, जामदा व गंधारी या, चार नद्या परस्परांना जोडण्याचे प्रस्तावित आहेत. यासाठी सुमारे १५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

हिमोफेलियाच्या औषधांसाठी २५ कोटी खर्च

हिमोफेलिया या आजारावरील औषधांसाठी आतापर्यंत राज्य शासनाने २५ कोटी रुपये खर्च केल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सांवत यांनी सांगितले. जगन्नाथ शिंदे व इतर सदस्यांनी याबाबतचा तारांकित प्रश्न विचारला होता. हिमोफेलिया आजारावरील औषधांची खरेदी केंद्र शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत उपलब्ध करून दिलेल्या निधीमधून करण्यात येते. हिमोफेलियाचे ४ हजार २२५ रुग्ण आढळले आणि या रुग्णांवर औषधोपचार करण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

२५ हजार शेततळ्याचे काम पूर्ण

मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत आतापर्यंत २५ हजाराहून अधिक शेततळी पूर्ण करण्यात आल्याचे रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. जयंत पाटील, विक्रम काळे यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न विचारला होता. या योजनेसाठी एकूण ९६ हजार ७७४ लोकांनी मागणी केली होती, त्यापैकी २५ हजार ९०३ शेतकऱ्यांच्या शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. शेततळे योजनेचा लाभ सर्व इच्छुक शेतकऱ्यांना घेता यावा यासाठी ५० पैसे आणेवारीची अट शिथिल करुन ही योजना सर्व जिल्ह्यांत राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.