जलवाहिनी फोडून पाणी घेणाऱ्यांविरुध्द कारवाई- बबनराव लोणीकर

0

मुंबई : जलवाहिनी फोडून बेकायदेशीर पाणी घेणाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल करुन फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

हिंगोली जिल्ह्यातील दाटेगाव येथे पाणीपुरवठ्यासंदर्भात प्रश्न सदस्य तानाजी मुटकुले यांनी उपस्थित केला होता, त्याला उत्तर देताना श्री.लोणीकर बोलत होते. श्री. लोणीकर म्हणाले की, दाटेगावचा पाणीपुरवठा थकीत पाणीपट्टीमुळे हिंगोली नगरपरिषदेने बंद केला होता. 50 हजार पाणीपट्टी वसूल करुन पुन्हा पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. सद्य:स्थितीत नियमित पाणीपुरवठा सुरु आहे. तसेच पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनी फोडून पाणी चोरी होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी दोषींवर कारवाई करण्यात येईल. असेही श्री. लोणीकर यांनी सांगितले. या चर्चेत विधानसभा सदस्य सर्वश्री सुनील देशमुख, जयप्रकाश मुंदडा यांनी सहभाग घेतला.