जलव्यवस्थापन कार्यासंबंधी प्रशिक्षण

0

जळगाव। जलयुक्त शिवार अभियान हा शासन प्राधान्य क्रमाने राबवित असलेला उपक्रम आहे. जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून भविष्यातील दुष्काळावर मात करता येणार आहे. पाण्याच्या बचतीसाठी सुक्ष्म नियोजन करणे गरजेचे असून जलयुक्तशिवार अभियानाचा पाण्याच्या नियोजनासाठी उपयोग होत आहे. जलयुक्तशिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात दोन टप्प्यात कामे करण्यात आली. या कामांमध्ये अधिकाधिक लोकसहभाग घेण्याबाबत शासनाने आवाहन केलेले होते. मात्र, लोकसहभाग मिळाल्याने विविध शासकीय यंत्रणांकडून ही कामे पूर्ण करून घेण्यात आली. आता तिसर्‍या टप्प्यात तरी लोकसहभाग मिळण्यासाठी ग्रामस्तरावर सरपंच, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, प्रगतीशील शेतकरी आणि महिला यांचे पथक तयार करण्यात येणार असून त्यांना जलव्यवस्थापन, जलसाक्षरता याबाबतचे प्रशिक्षण देवून जागृती करण्यात येणार आहे. तसेच 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

सप्टेंबरमध्ये प्रशिक्षण
ग्रामस्तरीय पथकांना पाल येथील कृषी विज्ञान केंद्र अमळनेर येथील राष्ट्रीय कृषी विकास संस्था यांच्यातर्फे जलसाक्षरता, जलव्यवस्थापन, वॉटर बजेट या संदर्भात 15 ते 30 सप्टेंबर या कालावधीत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर शिवार फेरीच्या आधारे गाव आराखडा निश्चित करण्यात येणार आहे. या गावांमध्ये गावस्तरीय पाणलोट तयार करून ग्रामस्तरीय पथके तयार करण्यात येणार आहेत. आराखड्यास तालुका जिल्हास्तरीय समितीची मान्यता घेण्यात येईल. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात 232 गावात पाच हजारावर कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत. दुसर्‍या टप्प्यातील 222 गावांमध्ये 4 हजार 934 कामे मंजूर करण्यात आली होती. त्यापैकी 4 हजार 801 कामे सुरु असून 4 हजार 260 कामे पूर्ण झाली आहेत. तर 541 कामे अपूर्ण असून आतापर्यंत 73 कोटी 43 लाख रुपये खर्च करण्यात आलेले आहेत.