जलशुध्दीकरण केंद्रात हजारो लिटर पाण्याची नासाडी

0
यावल – येथील जलशुध्दीकरणातुन हजारो लिटर पाण्याची नासाडीचे चित्र शनिवारी रात्री समोर आले. तर या प्रकरणी संबधीत कर्मचार्‍यांना नोटीसा काढत कठोर कारवाई केली जाईल असे मुख्याधिकारी सोमनाथ आढाव यांनी स्पष्ट केले आहे.
यंदाच्या पावसाळ्यात सातपुड्याच्या पर्वतात अत्यल्प पाऊस झाल्याने सातपुड्यातील जलाशयात जलसाठा कमी आहे. अशात आगामी पावसाळ्यात तालुक्याला टंचाईचे चटके लागण्याची शक्यता आहे. म्हणुन पाण्याचा अपव्यय नागरीकांनी टाळला पाहिजे असे सर्वत्र अवाहन केले जात असतांना पालिकेच्या जलशुध्दीकरण केंद्रात दररोज रात्री हजारो लिटर पाणी थेट वाहुन जात असल्याचे समोर आलेे. याबाबत नागरीकांनी शनीवारी रात्री नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांच्या निर्दशानास हा प्रकार आणला तेव्हा स्व:ता डॉ. फेगडे यांनी रात्रीचं जलशुध्दीकरण केंद्रावर भेट दिली मात्र, त्या ठिकाणी पालिका कर्मचारी हजर नव्हते व ही बाब त्यांनी थेट सोशल मिडीयावर टाकत पालिकेचा भोंगळ कारभार समोर आणला तर या प्रकरणी संबधीत दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्याधिकारी सोमनाथ आढाव यांनी दिले आहे. सुरवातीला या बाबत कारणे दाखवा नोटीसी बजावत खुलासा मागविण्यात येईल व नंतर कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगीतले आहे.