धुळे । राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवार अभियानासह जलसंधारणाच्या कामांत लोकसहभाग सर्वांत महत्वाचा आहे. लोकांनी या उपक्रमांमध्ये आपला सहभाग नोंदविला पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी केले. बुराई नदी पायी परिक्रमेचा शनिवार, 14 रोजी चौथा दिवस होता. चौथ्या दिवशी चिमठाणे येथून बुराई नदी पायी परिक्रमेला सुरुवात झाली. त्यानंतर सकाळी 11 वाजेच्या सुमारास परिक्रमेचे बाभूळदे गावात आगमन झाले. यावेळी दोंडाईचा कृउबाचे सभापती नारायण पाटील, लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन दुसाने उपस्थित होते.
दरखेडा येथे बंधार्याचे भूमीपूजन
ना. रावल यांच्या हस्ते बुराई नदीच्या पात्रात दरखेडा येथे बांधण्यात येणार्या बंधार्याचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बुराई नदीवर बाभूळदे, महाळपूरदरम्यान आवश्यकता असल्यास आणखी एका बंधार्याचे काम करण्यात येईल, असे ना. रावल यांनी यावेळी सांगितले. प्रारंभी मान्यवरांच्याहस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन ना. रावल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी यांच्याही प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. बुराई नदी पायी परिक्रमेंतर्गत ना. रावल यांनी दिवसभरात निशाणे, महाळपूर, अलाणे आदी गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला.
95 वर्षांच्या वृध्दाचा परिक्रमेत सहभाग
ना. रावल यांनी दुसाणे गावापासून सुरू केलेल्या बुराई नदी पायी परिक्रमेचे ठिकठिकाणी ग्रामस्थ स्वागत करीत परिक्रमेत सहभागी होत आहेत. या परिक्रमेत आज 95 वर्षीय सेवानिवृत्त शिक्षक व चिरणे-कदाणे येथील रहिवासी गैंधल भोई सहभागी झाले होते. त्यांनी निशाणे ते अलाणे असा पायी प्रवास केला. त्यांनी बाभूळदे येथे आपले मनोगत व्यक्त करताना बुराई नदी बारमाही झाल्यावर हा परिसर सुजलाम-सुफलाम होईल, असे नमूद केले.
आज समारोप…
गेल्या चार दिवसांपासून सुरू झालेल्या बुराई नदी पायी परिक्रमेचा रविवार, 15 रोजी समारोप होणार आहे. यानिमित्त शिंदखेडा येथे सकाळी 10.30 वाजता राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. तत्पूर्वी ना. रावल सकाळी 7 वाजता कुमरेज येथून पायी परिक्रमेला सुरुवात करतील. त्यानंतर 8 वाजता शिंदखेडा येथे आगमन व चर्चा, 9.30 वाजता शिंदखेडा येथून पाटणकडे प्रयाण, 10.30 वाजता बुराई नदीवर पाटण शिवारात केटीवेअरचे भूमिपूजन होईल.