जळगाव । केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने अमळनेर तालुक्यातील जुनोने येथे जलसंधारणाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावर्षीच्या नियोजनात गावातील गावठाण जमिनीवर सी.सी.टी. आणि अतिरिक्त पाण्याचा निचरा होणार्या चार्यांचे खोलीकरण करण्याचे ठरवले असून सुमारे 28 गुंठे जमिनीवर हे काम करण्यात येणार आहे. माधवराव गोळवलकर रक्तपेढीचे संचालक संजय भावसार आणि ललित कला अकादमीचे प्रमुख पियुष रावळ यांच्या शुभहस्ते कुदळ मारून कामाची सुरुवात झाली.
गेल्या वर्षापासून जलसंधारणाचे काम
या कामाच्या नियोजनात जळगाव कृषी उपसंचालक अनिल भोकरे, जलनायक शिवाजी भोईटे, अमळनेर कृषी अधिकारी व्हाय.ए.बोरसे आणि एस.ए.लांडगे यांची मदत झाली. यावेळी जनसंपर्क अधिकारी कृणाल महाजन जुनोने गावातील जलदूत सतीश पाटील, सरपंच, सदस्य आणि ग्रामस्त उपस्थित होते. केशवस्मृतीच्या माध्यमातून गेल्या वर्षापासून जलसंधारणाचे काम सुरु आहे. जुनोने गावासोबतच धरणगाव तालुक्यातील भोणे आणि पारोळा तालुक्यातील शेळावे या गावांमध्ये मागील वर्षी झालेल्या कामामुळे परिसरातील शेतकर्यांना मोठा फायदा झाला आहे. जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली आहे. या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरडवाहू शेती असल्यामुळे शेतकर्यांवरील दुबार – तिबार पेरणीचे संकट टळले होते. म्हणून यंदाच्या कामात अधिक उत्साह येवून ग्रामस्थांच्या मदतीने या कामाचा शुभारंभ झाला आहे.