जलसंधारणास निधी कमी पडू देणार नाही

0

शिंदखेडा । तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती निवारण्यासाठी होत असलेल्या जलसंधरणाच्या कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. ना. रावलांनी केलेल बुराई परिक्रमा ही ह्या तालुक्यातील शेतकर्‍यांना व नागरिकांना पाणीटंचाई पासून मुक्त करेल. ह्या नदीवर जलसंधारणाच्या माध्यमातून 34 बंधार्‍यांची काम पूर्ण करण्यासाठी 21कोटी 21 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. ह्या परिक्रमेतून ना.रावळ यांनी विरोधकांना चोख उत्तर दिले आहे. राज्यातील भाजपाच्या मंत्र्यांनी लोकशाहीचा उपयोग शेतकर्‍यांच्या विकासाठी केला आहे असे प्रतिपादन जलसंधारण मंत्री ना.प्रा.राम शिंदे यांनी केले.

सर्वांना न्याय देण्याची भूमिका
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गेंदल तावडे ( वय 95वर्ष) होते. ह्या वेळी बोलतांना मंत्री राम शिंदे म्हणाले,सत्ता नसतांना देखील ना. रावल यांनी जलसंधारणाची कामे तालुक्यात होण्यासाठी पाठपुरावा केला. मात्र तत्कालीन राज्यकर्त्यांनी साथ दिली नाही.परंतु भाजपाची राज्यात सत्ता आल्यानंतर शेतकर्‍यांना व सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका राज्यशासनाने घेतली. काँग्रेसच्या काळात जलसंधारणाची कामे झाली नसल्याने दुष्काळी स्थिती निर्माण झाली. त्यामुळे भाजपा सत्तेत आल्यानंतर प्रथमतः जलसंधारणाच्या कामांना प्राध्यान दिले व निधी देखील उपलब्ध करून दिला. यापुढेही निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही ना. शिंदे ह्यांनी दिली.

शेतकर्‍यांचा पाठिंबा
या परीक्रमेत प्रत्येक गावातील शेतकर्‍यांनी नवी उमेद व भरघोस पाठिंबा दिला. या परीक्रमेत 95 वर्षीय गेंदल तावडे यांच्यासह बालगोपाळ उत्साहाने सहभागी झाले होते या सर्वांचे आभार ना.रावल यांनी मानले. यावेळी देवा कोथे, सुभाष माळी, कृऊबा चे सभापती नारायण पाटील, यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कामराज निकम यांनी केले तर सुत्रसंचालन प्रा. प्रदिप दिक्षीत यांनी केले.

शेतकरी मेळाव्याचे आयोजन
शिंदखेडा तालुक्यात माथा ते पायथा बूराई परिक्रमा कार्यक्रम ना.जयकुमार रावल यांनी हाती घेतला होता. आज शिंदखेडा येथील बिजासानी मंगल कार्यालयात झालेल्या शेतकरी मेळाव्यात ह्या परिक्रमेची सांगता करण्यात आली. या वेळी ना. शिंदे बोलत होते. ह्या कार्यक्रमास पर्यटन मंत्री जयकुमार रावल, सचिव एकनाथ डवले, विजय चौधरी, संजीवनी सीसोदे, रजनी वानखेडे, कामराज निकम, नारायण पाटील, सुभाष माळी, युवराज माळी,अनिल वानखेडे भाजपाचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

दुष्काळी स्थिती बदलण्यास सरकार कटिबध्द
राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये प्रामाणिकपणे काम केल्याचे फळ निश्‍चितपणे मिळते हे ना. रावळ यांना मिळालेल्या विकास कामांच्या निधिवरून स्पष्ट होते. आगामी काळात देखील दुष्काळी स्थिती बदलण्यासाठी राज्यातील भाजप सरकार कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.बुराई परीक्रमेचे शिल्पकार व पर्यटन मंत्री जयकुमार रावल म्हणाले, काँग्रेसच्या काळात राज्याची पिछेहाट झाली. शेतकरी हवालदिल झाला. भाजपने सत्ता हाती घेतली तेव्हा अनेक अडचणी होत्या. या अडचणी सोडविण्याचा शिवधनुष्यच उचलला आहे. या राज्यातील शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी जलक्रांती हेच ध्येय ठेवले. माथा ते पायथा बुराई नदी बारमाही करण्यासाठी पाच दिवस परीक्रमा केली.यांत या नदीवर 34बंधारे बांधण्यात येणार असून भूमिपूजन करण्यात आले.या बंधार्‍यांची कामे पावसाळयापूर्वी पूर्ण करण्यात येतील असे आश्‍वासन दिले.

विकासकामांमुळे विरोधकांचे तोंड बंद
बुराई परिक्रमा ही संकल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी तालुक्यातील जनता, शेतकरी, व कार्यकर्ते ह्यांचा मोठा पाठिंबा मिळाला. त्यांनी केलेली ही परिक्रमा ह्या तालुक्यात निश्‍चित पणे जलक्रांती घडवेल, ह्यात शंका नाही. ना. रावळ यांच्या प्रयत्नातून मतदार संघामध्ये होत असलेल्या विकास कामामुळे विरोधकांची तोंड बंद झाली आहेत.