खंडपीठाचा निकाल ; माजी मंत्री एकनाथराव खडसे गटाला धक्का
भुसावळ (गणेश वाघ)- वरणगाव पालिकेतील अधिकृत गटनेता कोण? यावरून पोहोचलेला वाद खंडपीठात गेल्यानंतर शुक्रवारी खंडपीठाचे न्या.एस.व्ही.गंगापूरवाला व न्या.अरुण ढवळे यांनी जलसंपदा मंत्र्यांचे खंदे समर्थक सुनील काळे हेच अधिकृत गटनेता असल्याचा निकाल दिल्याने काळे यांना मोठा दिलासा मिळाला असून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या गटाला हा मात्र मोठा धक्का मानला जात आहे.
व्हीपवरून भाजपाच्या दोन गटात पडली फूट
28 नोव्हेंबर 2017 रोजी झालेल्या वरणगाव पालिकेच्या निवडणुकीत भाजपाचे सुनील काळे नगराध्यक्षपदी विराजमान झाले होते. तत्पूर्वी काळे यांनी 24 नोव्हेंबर रोजी स्वतःला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करीत भाजपा नगरसेवकांना मतदान करण्याबाबत व्हीप बजावला होता तर उपनगराध्यक्ष पदासाठी शेख अखलाख यांना मतदान करण्याचे आवाहन केले होते मात्र माजी मंत्री खडसे गटातील नगरसेवकांना काळे यांची उमेदवारी मान्य नसल्याने त्यांनी 27 नोव्हेंबरला गटनेता बदलाची नोंदणी जिल्हाधिकार्यांकडे करीत नितीन माळी हे गटनेता असल्याचे जाहीर केले होते शिवाय नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रोहिणी जावळे असल्याने त्यांनाच मतदान करण्याचा व्हीप बजावला होता.
जलसंपदा मंत्र्यांची इन्ट्री अन् खडसे गटाला धक्का
माजी मंत्री खडसे गटात राहिलेल्या काळेंना संधी मिळत नसल्याने त्यांनी जामनेरचा आश्रय घेत जलसंपदा मंत्र्यांना साकडे घातले होते. महाजनांनी काळे यांच्या विजयासाठी राजकीय डावपेच आखल्यानंतर राष्ट्रवादीच्या उमेदवाराने माघार घेत काळेंना पाठिंबा दर्शवला होता व 28 नोव्हेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत काळे यांना भाजपाच्या आठ नगरसेवकांपैकी माला मिलिंद मेढे, नसरीन बी.कुरेशी यांच्यासह राष्ट्रवादीच्या पाच व दोन अपक्षांनी मिळून मतदान केल्यानंतर काळे यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागली होती तर खडसे गटाचा पराभव झाला होता.
निवडीनंतर गटनेत्याचा वावद पोहोचला खंडपीठात
काळे यांची नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतरही गटनेतेपदाचा वाद कायम राहिल्याने खंडपीठात धाव घेण्यात आली. सुमारे दोन वर्ष या प्रकरणात सुनावणी होवून शुक्रवार, 1 मार्च 2019 रोजी औरंगाबाद खंडपीठाचे न्या.एस.व्ही.गंगापूरवाला व न्या.अरुण ढवळे यांनी जलसंपदा मंत्र्यांचे खंदे समर्थक असलेले सुनील काळे हेच भाजपाचे वरणगाव पालिकेतील अधिकृत गटनेता असल्याचा निकाल दिल्याने काळेंना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्यातर्फे अॅड.धोर्डे पाटील, अॅड.विजयकुमार सपकाळ यांनी काम पाहिले.
अखेर सत्याचा विजय झाला -नगराध्यक्ष काळे
ज्यांच्यासोबत 25 वर्ष एकनिष्ठ राहिलो मात्र त्यांनी न्याय दिला नाही. न्यायासाठी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागले हे दुदैव असून शेवटी सत्याचा विजय झाला असल्याचे नगराध्यक्ष सुनील काळे म्हणाले.
गटनेत्यांचा व्हीप पाळला -माला मेढे
निवडून आल्यानंतर पाच वर्ष पक्षाशी एकनिष्ट राहिलो, पक्षाने दिलेल्या आदेशाचे वेळोवेळी पालन केले होते. गटनेता सुनील काळे असताना त्यांनी बजावलेल्या व्हीपचे पालन केले मात्र काहींनी आम्हाला बंडखोर म्हटले त्यामुळे उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय म्हणजे सत्याचा विजय झाला असल्याचे माला मिलिंद मेढे म्हणाल्या.
न्यायालयाचा निकाल मान्य -नितीन माळी
उच्च न्यायालयाने दिलेला निकाल मान्य असून जिल्हाधिकार्यांनी दिलेले अॅफेडेव्हीट खंडपीठात वेळेत सादर झाले नसल्याचे नगरसेवक नितीन माळी म्हणाले.