जलसंपदा मंत्र्यांच्या तालुक्यात जलशिवार योजनांची दयनीय अवस्था

0

 

जळगाव : राज्याचे जलसंपदामंत्री असलेल्या गिरीष महाजन यांच्या जामनेर तालुक्यातील जलशिवार योजनेची अवस्था अत्यंत दयनिय असल्याचे जिल्हा परिषदमध्ये घेण्यात आलेल्या ग्रामसेवक, तलाठी, कृषीसेवकांच्या बैठकीतून दिसून आले. जामनेर तालुक्यात विहीर पुर्नभरण, मागील त्याला शेततळी आदी जलशिवार योजनअंतर्गत करण्यात आलेल्या कामाची संख्या अत्यल्प आहे. जामनेर तालुक्यात ‘मागील त्याला शेततळी’ या योजनअंतर्गत केवळ 22 कामे झालेली असून संपुर्ण जळगाव जिल्ह्यात फक्त दोनशे कामे झालेले आहे. त्यात एकट्या नगाव येथे शंभर कामे झालेली आहे. विहीरपुर्नभरण कामाचे तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मार्फत केवळ दोन-चार कामेच झाली आहेत.

‘स्वच्छ भारत अभियानात जामनेर जिल्ह्यात पिछाडीवर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी अभियान म्हणजे स्वच्छ भारत अभियानात जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुका पिछाडीवर असून तालुक्यात केवळ 30 हजार शौच्छालये बांधण्यात आले आहे. ही आकडेवारी अत्यल्प आहे. तसेच जामनेर तालुका आधारकार्ड नोंदणीकरण करण्यात जिल्ह्यात पिछाडीवर असून 17 हजार आधार नोंदणी बाकी आहे. 0 ते 6 वयोगटातील बालकांचे सर्वाधिक 6 हजार आधार नोंदणी बाकी आहे. जळगाव जिल्हा परिषदेत जामनेर आणि जळगाव तालुक्यातील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी अस्तिककुमार पांण्डेय, वनअधिकारी आदर्श रेड्डी, उपजिल्हाधिकारी महसूल अभिजित भांडे पाटील, उपमुख्यकार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत प्रशासन मिनल कुट्टे, उपमुख्यकार्यकारी अधिकरी राजन पाटील उपस्थित होते.

सीईओं, जिल्हाधिकार्‍यांनी काढली ग्रामसेवकांची कानउघडणी
शासन ग्रामीण भागातील जनतेसाठी भरपूर योजना देत आहेत. परंतु ग्रामसेवक योग्य प्रमाणात योजनेची अमंलबजावणी करी नसून तळागाळातील जनतेपर्यत या योजना पोहचवित नाही. तुमची ‘अक्कल’ कोठे गेली? तुम्ही कामे का करीत नाही. जनतेला काही देण्याची तुमची मानसिकता का नाही आहे? अशा भाषेत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी ग्रामसेवकांना खडसावले. ग्रामीण भागातील तरुण बेरोजगार संख्या मोठ्या प्रमाणात असुन त्यांना रोजगार मिळावा म्हणून ग्रामसेवकांनी कोणते काम केले आहेत? सकाळ संध्याकाळ देवाची पुजा करण्यापेक्षा शासन देत असलेल्या योजना योग्यरित्या जनतेपर्यत पोहचवा. त्याचे तुम्हाला पुण्य मिळेल असा सल्ला जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी ग्रामसेवकांना दिला.

शौच्छालय बांधकाम उद्दिष्टपूर्ती शिवाय पगार नाही
जिल्ह्यात 3 लाख शौच्छालयाचे बांधकाम करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने ठेवले आहे. जोपर्यत शौच्छालय बांधण्याचे उद्दिष्टपूर्ती होणार नाही तोपर्यत माझ्यासहीत कोणत्याही अधिकार्‍यांना जानेवारी महिन्यापासून पगार दिला जाणार नाही. असे सीईओं यांनी सांगितले.

3 वर्षात 50 लाख वृक्ष लागवड झाले पाहिजे
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीने प्रतिवर्ष 364 वृक्षलागवड करावी. अशा प्रमाणे 2017-19 या तीन वर्षात 50 लाख वृक्ष लागवड करण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनाने केले असल्याचे भारतीय वन अधिकारी आदर्श रेड्डी यांनी सांगितले.