जलसंपदा मंत्र्याच्या आदेशाचे सीईओंकडून पालन नाही!

0

जळगाव: जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांमध्ये पती-पत्नी एकत्रिकरणात गुगल मॅपिंगचे अंतर ग्राह्य धरुन बदल्या करण्यात आल्या. मात्र या अंतरात त्रुटी असल्याने अनेक शिक्षकांवर अन्याय झाला असून गुगल ऐवजी एसटी महामंडळाचे अंतर ग्राह्य धरण्याच्या सुचना जलसंपदामंत्री ना.गिरीष महाजन यांनी सीईओंना दिल्या होत्या. तरी देखील याची अंमलबजावणी होत नसल्याने जि.प. समोर उपोषणास बसण्याचा इशारा जि.प. सदस्या पल्लवी सावकारे यांनी दिला आहे.

शिक्षक बदल्यांमध्ये होणारे घोळ टाळण्यासाठी शासनाने ऑनलाईन बदली प्रक्रिया राबविली. मात्र यात अनेकांनी बोगस दाखले सादर करुन सोयीची बदली करुन घेतली. तर पती-पत्नी एकत्रिकरणात गुगल मॅपिंगचे अंतर ग्राह्य धरण्याच्या सुचना व्हॉट्सऍपवरुन देण्यात आल्या होत्या. मात्र बहुतांश शाळांचे प्रत्यक्ष अंतर हे चुकीचे असल्याने अनेक शिक्षकांवर अन्याय झाला आहे. हि बाब जि.प. सदस्या पल्लवी सावकारे यांनी सर्वसाधारण सभेत प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. तसेच धुळे, नगर आणि पुणे जिल्हा परिषदेने गुगल मॅपऐवजी एसटी मार्गाचे अंतर ग्राह्य धरण्याचा ठराव करुन घेतला त्यामुळे आपल्या जिल्ह्यातही याची अंमलबजावणी करुन या शिक्षकांना एकत्रिकरणाचा लाभ मिळण्याची मागणी सभागृहात केली. यानंतर सावकारे यांच्या पाठपुराव्यानंतर जलसंपदामंत्री ना.गिरीष महाजन यांनी देखील सीईओंना एसटी मार्ग ग्राह्य धरण्याच्या सुचना केल्या होत्या. मात्र शिक्षण विभागाकडून याबाबत कुठलीही हालचाल होतांना दिसून येत नाही. सभागृह आणि जलसंपदामंत्र्यांच्या सुचनेला जि.प. प्रशासनाने केराची टोपली दाखविली असल्याचे यावरुन दिसून येते. त्यामुळे प्रशासनाच्या या भुमिकेविरोधात जि.प. समोर आंदोलन करण्याचा इशारा जि.प. सदस्या पल्लवी सावकारे यांनी दिला आहे.