मुंबई : नवी मुंबई विमानतळ प्रभावित अधिसूचित क्षेत्रातील (नैना) गावांना पाणी पुरवठ्यासाठी जलसंपदा विभागाच्या अंतर्गत असलेला कोंढाणे प्रकल्प सिडकोकडे हस्तांतरित करण्याच्या निर्णयास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा मालकी हक्क आता सिडकोकडे जाणार असून त्यामुळे या क्षेत्रातील 270 गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
कोंढाणे प्रकल्प हा जलसंपदा विभागाच्या कोकण पाटबंधारे विकास महामंडळामार्फत राबविण्यात येत आहे. नैना क्षेत्रातील गावाच्या पाण्याची सध्याची व भविष्यातील गरज लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने हा प्रकल्प सिडकोकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला. यानुसार यापुढील काळात या प्रकल्पाचा सर्व खर्च सिडको करणार असल्याचेही गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले.
या प्रकल्पाची सध्या चौकशी सुरू आहे. या चौकशीस कोणतीही बाधा न येता हा प्रकल्प सिडको राबविणार आहे. कोंढाणे प्रकल्पामध्ये एकूण 105.97 दलघमी इतका पाणी साठा होणार असून या प्रकल्पास पाणीपुरवठा प्रकल्प म्हणून मंजुरी देण्यात आली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.