नारायणगाव । येडगाव धरण जलाशयात व कुकडी नदीपात्रातील बंधार्यात प्लॅस्टिक पिंपाच्या तरफेचा वापर करून सोडलेले उपसा जलसिंचन योजनेचे कृषिपंप धोकादायक ठरले आहेत. कृषिपंपाला जोडलेल्या सदोष वीजवाहक केबलमधील वीजप्रवाह पाण्यात उतरल्याने विजेचा धक्का बसून सात शेतकर्यांचा मृत्यू झाला आहे. यापैकी गेल्या दोन महिन्यांतील तीन घटनांत पाच शेतकर्यांचा मृत्यू झाला आहे. असे असूनही त्यावर उपाययोजना आखण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. कुकडी प्रकल्पांतर्गत पाच धरणांपैकी येडगाव धरणात सर्वाधिक उपसा जलसिंचन योजना आहेत. येडगाव, ओझर, धनगरवाडी, उंब्रज, कांदळी, पिंपळवंडी, बोरी, चौदानंबर, गणेशनगर या भागातील बहुतेक शेतकर्यांनी येडगाव धरण जलाशयात व कुकडी नदीपात्रात जलसिंचन योजनेचे कृषिपंप बसवले आहेत.
साठवण धरण म्हणून उपयोगात असलेल्या येडगाव धरणात डिंभा, वडज, माणिकडोह, पिंपळगाव जोगे, चिल्हेवाडी या धरणातून पाणी सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. येडगाव धरणत कालव्याद्वारे प्रामुख्याने पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या भागाला सिंचन व बिगर सिंचनासाठी रब्बी, खरीप व उन्हाळी हंगामासाठी सोडले जाते. यामुळे येडगाव धरणाची पाणीपातळी सातत्याने कमी जास्त होत असते. वारंवार कमी जास्त होणार्या धरणातील पाणीपातळीचा परिणाम उपसा जलसिंचन योजनेवर होऊ नये, यासाठी शेतकर्यांनी पाण्यावर तरंगणार्या प्लॅस्टिक पिंपाच्या तरफेचा वापर करून कृषिपंप पाण्यात सोडले आहेत.
वीजप्रवाह पाण्यातून उतरण्याचा धोका
कृषिपंपाच्या वीजवाहक केबलचे जाळे पाण्यात पसरले आहे. बंधार्यात याच पद्धतीने शेकडो कृषिपंप तरंगताना दिसतात. पाण्याच्या प्रवाहामुळे कृषिपंपाच्या केबल तुटण्याचा धोका असता. केबल तुटल्यास उच्च दाबाचा वीजप्रवाह पाण्यात उतरून अपघात होतात. याचा धोका शेतकर्यांबरोबर धरणात मच्छीमारी करणार्यांनासुद्धा आहे. मार्च ते मे दरम्यान धरण पाणीपातळी कमी झाल्यामुळे कृषिपंप गाळात अडकतात. गाळ काढण्यासाठी किंवा कृषिपंपांची जागा बलदण्यासाठी शेतकरी पाण्यात उतरतात. सदोष वीजवाहक केबलमुळे
अपघातात होतात.