जळगाव। राज्यशासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाचा चांगला परिणाम दिसून येत असून जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या जलसंधारण उपचारांच्या कामांमुळे जिल्ह्यातील भूजल पातळीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. यातच मार्च 2017 अखेर जिल्ह्यातील निरीक्षण विहिरींच्या पातळीची मोजणी केल्यानंतर ही वस्तुस्थिती स्पष्ट झाली आहे. यासोबतच जलसुरक्षक प्रणालीद्वारे भूजल पातळीचे दरमहा मोजमाप होणार असल्याने यासाठी गावा गावात जलसुरक्षक प्रणालीचे प्रशिक्षण गावांतील युवकांना देण्यात आले आहे, अशी माहिती मिळाली आहे.
121 कोटी रुपयांचा निधी खर्च
जलयुक्त शिवार अभियानात पहिल्या टप्प्यात 232 गावांत विविध कामे करुन जलसंधारण करण्यात आले. दुसर्या टप्प्यात 222 गावांमध्ये ही कामे सुरु आहेत. या कामांमुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी पाणी अडवून जिरवण्यात आले. त्यातही जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 232 गावांत 31 हजार 956 .53 हेक्टर क्षेत्रावर जलसंधारण उपचार 7200 कामांमधून राबविण्यात आले. त्यासाठी शासनाने 121 कोटी रुपयांचा निधी खर्च केला. या कामांमध्ये लोकसहभाग हा अतिशय महत्त्वाचा घटक ठरला. त्यातच यंदा पावसाळा चांगला झाल्याने खोलीकरण केलेले नाले, गाळ काढलेले तलाव आणि सर्व उपचारांमध्ये चांगल्याप्रमाणावर पाणी अडलं आणि जिरलं सुद्धा. याचा परिणाम भूजल पातळी वाढण्यात झाला आहे.
तालुकानिहाय भुजलपातळी
गत वर्षी मार्च 2016 मध्ये जिल्ह्यातील तालुकानिहाय सरासरी भुजल पातळी ही याप्रमाणे होती. मुक्ताईनगर 13.35 मीटर, रावेर 20.36, भुसावळ 14.56, बोदवड 13.18, यावल 30.08, जामनेर 10.76, जळगाव 20.67, धरणगाव 11.25, एरंडोल 7.50, चोपडा 17.70, अमळनेर 14.15, पारोळा 9.50, पाचोरा 9.46, भडगाव 9.29, चाळीसगाव 9.73 अशी नोंदविण्यात आली होती. तर यंदा म्हणजे मार्च 2017 मध्ये झालेल्या मोजणीत समोर आलेली आकडेवारी याप्रमाणे- मुक्ताईनगर 14.16 मीटर्स, रावेर 20.32, भुसावळ 12.27, बोदवड 12.48, यावल 24.84, जामनेर 10.02, जळगाव 17.65, धरणगाव 9.78, एरंडोल 7.38, चोपडा 16.47, अमळनेर 13.10, पारोळा 8.19, पाचोरा 8.57, भडगाव 8.91, चाळीसगाव 8.77 याप्रमाणे . या आकडेवारीवरुन केवळ मुक्ताईनगर तालुक्याची जलपातळी घटलेली दिसत आहे.
1544 गावांमध्ये निरिक्षण विहिरी
उर्वरित सर्वच तालुक्यात जलपातळीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ही पाणी पातळी मोजण्यासाठी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात निरिक्षण विहिरी तयार करण्यात आल्या आहेत. त्यानुसार ही भूजल पातळी मोजली जाते. ऑक्टोबर महिन्यात आणि मार्च महिन्यात अशी वर्षातून दोन वेळा ही पातळी मोजली जाते. या मोजमापात अधिक अचूकता यावी यासाठी जिल्ह्यात 1544 गावांमध्ये निरिक्षण विहिरी निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यातील 265 विहिरी व्यवहार्य नसल्याने उर्वरित 1279 विहिरींची पातळी दर महिन्याला 25 ते 30 तारखेदरम्यान मोजण्यात येईल. यासाठी गावा गावात जलसुरक्षक प्रणालीचे प्रशिक्षण गावांतील युवकांना देण्यात आले आहे.