जलस्त्रोत आटल्याने पाण्याच्या जारला वाढली मागणी

0

भुसावळ। लग्न सोहळ्यामध्ये पूर्वी पाण्याचा वेगळा खर्च करण्याची गरज नव्हती. विशेषत: ग्रामीण भागात तर मोफतच पाणी उपलब्ध होत होते. आता मात्र ग्रामीण भागातही जलस्त्रोत आटल्याने सोहळ्यांसाठी पाण्याच्या जार आणि टँकर मागविले जात आहे. त्यामुळे वधू पित्याचा खर्च वाढला आहे. तालुक्यातील पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. त्यात विविध सोहळे, लग्न समारंभ आदींमध्ये शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही थंडगार पाण्याच्या जारची मागणी वाढली आहे.

वॉटर जारचा व्यवसाय वाढला
उन्हाळा आला की, प्रत्येक घरोघरी नव्या माठाला मागणी होती. माठातील थंडपाणी पिल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची तहान भागत होती. मात्र वाढत्या उष्णतेमुळे माठापेक्षा थंड पाण्याची मागणी वाढली आहे गेल्या वर्षभरापासून शहरासह ग्रामीण भागात बदलत्या काळानुसार नवीन तंत्राच्या सहाय्याने पाणी फिल्टर करून थंड केल्यावर 30 रुपयांमध्ये एक जार भरुन पाणी मिळत आहे. जारचे पाणी सध्या उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन प्रत्येक गावात दिसत आहे. लग्न सोहळे, वाढदिवस, धार्मिक कार्यक्रम, राजकीय कार्यक्रमासह शहरातील प्रत्येक दुकानात थंडगार जारचा पाणीपुरवठा होत आहे. शहरात दहा ते बारा जार वॉटरचे व्यवसाय आहेत. त्यामुळे प्रत्येक शासकीय कार्यालयासह लहान-मोठे उद्योगधंदे करणार्‍यांमध्ये देखील या कॅनची मागणी वाढली आहे. पूर्वी ग्रामीण भागात उन्हाळ्यामध्ये होत असलेल्या लग्न समारंभात बर्फाच्या लादी वापरून पाणी थंड केल्या जात होते. पूर्वी ग्रामीण भागात लाकडाचा भुसा व गोणपाटात गुंडाळून ही लादी लग्नसमारंभाकरिता ग्रामीण भागात नेताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत होती. आता मात्र कॅनच्या पाण्यामुळे ही कसरत थांबली आहे. माफक दरात थंड पाणी मिळत असल्याने ग्रामीण भागातही आता जारचे पाणी वापरल्या जात आहे.