जल अभियानाच्या कामात जलसाक्षरता केंद्राची भूमिका महत्त्वाची : मुख्यमंत्री

0

पुणे । जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून निर्माण झालेला उत्साह चिरकाल टिकविण्यासाठी शासनाकडून जलसाक्षरता केंद्र सुरू करण्यात आले आहे. या माध्यमातून नेमलेले साडेसात हजार स्वयंसेवक आपल्या भागातील पाण्याचा वापर, पीकपद्धती, नियोजन यावर लक्ष ठेवतील. जल अभियानातून निर्माण झालेले काम संस्थात्मक पातळीवर सुरू ठेवण्याचे काम जलसाक्षरता केंद्र करेल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

यशदा येथे सुरू करण्यात आलेल्या जलसाक्षरता केंद्राचा शुभारंभ रविवारी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. या वेळी जलबिरादरीचे प्रणेते राजेंद्रसिंह, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, जलसंधारणमंत्री राम शिंदे, राज्यमंत्री विजय शिवतारे, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, सामाजिक कार्यकर्ते पोपट पवार, यशदाचे संचालक आनंद लिमये आदी उपस्थित होते.

गिरीश महाजन म्हणाले, जलसाक्षरता योजनेसाठी 28 कोटी 30 लाख रुपये मंजूर केले आहेत. शेतकजयांना न्याय द्यायचा असेल तर त्याला पाणी आणि वीज द्यावी लागेल. यापुढील काळात ठिबक सिंचनाचा अवलंब केला जाणार आहे. विजय शिवतारे म्हणाले, पाण्याची उपयोगिता वाढविण्यावर भर दिला जात आहे. शहरातल्या पाण्याचे योग्य नियोजन केले पाहिजे. पुस्तकामध्ये जलसाक्षरता मोहिमेचा समावेश केला पाहिजे. यशदा येथील जलसाक्षरता केंद्र हे मुख्यालय असेल, विभागीय पातळीवर त्याची कार्यालये स्थापन करण्यात येतील. या कार्यालयांच्या माध्यमातून जलसाक्षरता जागृतीचे काम केले जाईल.

राजेंद्र सिंह यांना जलकुंभ सुपूर्त
पाच खोर्‍यातील नद्यांचे आणलेले पाणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एका जलकुंभात एकत्र करण्यात आले. हा जलकुंभ मुख्यमंत्र्यांनी जलपुरुष राजेंद्र सिंह यांच्याकडे सुपूर्त केला. राजेंद्र सिंह मंगळवारपासून जल संरक्षणाच्या प्रबोधनासाठी ‘चंद्रभागा नमामि’ ही यात्रा करणार आहेत. या यात्रेमध्ये हा जलकुंभ घेऊन ते फिरणार आहेत.

4 प्रकारच्या जलसाक्षरता असाव्यात
जनतेची दुष्काळ व पुरापासून सुटका झाल्यानंतर खर्‍या अर्थाने स्वातंत्र मिळाले असे म्हणता येईल. राज्यातील 4 वेगवेगळ्या प्रकारच्या जलसाक्षरता राबविल्या जाणे आवश्यक आहे. पर्जन्यचक्र व राज्यातील पीक पद्धती यामध्ये समन्वय निर्माण झाला पाहिजे. राज्याला पाणीदार बनविण्याची मोहीम सुरू होत आहे. छोट्या नद्यांना प्रवाहित करण्याचे काम दुसर्‍या टप्प्यात हाती घेतले जावे.
– राजेंद्रसिंह, जलतज्ज्ञ