जळगावची तन्वी मल्हारा ठरली मिस मल्टीनॅशनल इंडियाची मानकरी

0

डिसेंबरमध्ये दिल्लीत होणार मिस मल्टिनॅशनल आंतरराष्ट्रीय स्पर्धा

जळगाव – सौंदर्य आणि टॅलेंट यावर आधारित मिस इंटरनॅशनल, मिस मल्टीनॅशनल व मिस अर्थ या आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत निवड होण्यासाठी जयपूर येथे 29 रोजी पार पडलेल्या ”ग्लॅमआनंद सुपर मॉडेल इंडिया” स्पर्धेत जळगावच्या तन्वी मल्हाराने मिस मल्टीनॅशनलचा किताब जिंकला. ब्रेन वुईथ ब्युटीचे निकष असणार्‍या या सौंदर्य स्पर्धेत तन्वीने आपल्या सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि कॉमनसेन्सने उपस्थितांना भुरळ पाडत स्पर्धेत मिस मल्टिनॅशनलचा किताब खेचून आणला. ब्युटी वुईथ कॉजचे अतिशय समर्पक उदाहरण परीक्षक आणि उपस्थितांसमोर ठेवून तन्वीने या किताबावर आपले व अप्रत्यक्षरित्या जळगावचे नाव कोरले.

तन्वीने जिंकली उपस्थितांची मने
तन्वी विविध टप्पे पार करून टॉप 19 मधून तन्वी टॉप 12 पर्यंत पोहचली. नंतर अंतिम टॉप 7 मध्ये निवड झाली. टॉप 7 मध्ये प्रत्येकाच्या बुद्धिमत्ता, कॉमनसेन्स, सामाजिक भान या कौशल्याचा कस लागला. यामध्ये तन्वीला दोन प्रश्न विचारण्यात आले होते, ”तू रेडिओ जॉकी राहिलेली आहेस, तुझ्या दृष्टीने समोरच्याचा आवाज महत्वाचा आहे की चेहरा?’ यावर तन्वीने अतिशय सहज उत्तर दिले की मी आवाजाला महत्व देईल. कारण चेहर्‍यावरून गफलत होऊ शकते.” दुसरा प्रश्न तिला ”मी टू” या कॅम्पेन बद्दल विचारण्यात आला होता. त्यात तिने सहज उत्तर देत उपस्थितांची मने जिंकली.

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आता भारताचे प्रतिनिधित्व करणार
इतर राऊंड सोबतच सोशल मीडिया राऊंडचा देखील समावेश होता. यामध्ये फेसबुक, इंस्टाग्रामच्या पेजवर किती लाईक, शेअर व कमेंट्स मिळतात यावरून गुण दिले जाणार होते. यामध्ये तन्वीला इंस्टाग्रामवर सर्वाधिक आठशे लाईक्स व सातशे पंधरा कमेंट्स तसेच फेसबुकवर चारशे त्रेचाळीस लाईक्स व तीनशे नव्वद कमेंट्स मिळाले. त्याच प्रमाणे सौंदर्य स्पर्धेत निवड झालेल्या स्पर्धकांना सामाजिक कार्यासाठी देखील निधी गोळा करून देण्याचा टास्क देण्यात आला होता. यामध्ये तन्वीने सर्वाधिक सत्तर हजार रुपये स्वराज जनकल्याण समिती या आयोजकांनी दिलेल्या सामाजिक संस्थेसाठी गोळा करून दिले. येत्या डिसेंबर महिन्यात दिल्ली येथे मिस मल्टिनॅशनल या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आता तन्वी अन्य देशांच्या स्पर्धकांसोबत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.तन्वीने काही वर्ष रेडिओ जॉकी म्हणून देखील काम केले. येथे तिच्या बोलण्याच्या आणि लोकांशी संवाद साधण्याच्या कलेला पुरेपूर वाव मिळाला. परंतु तेथे फक्त लोकांचा आवाज ऐकू येत असे वा केवळ आवाजाद्वारे संवाद साधता येत असे म्हणून तिने त्या सोबतच वेब सिरीज, शॉर्ट फिल्म, म्युझिक अल्बम्स देखील केले. वेगवेगळे प्रयोग करीत असतांनाच तिच्यातील वेगवेगळ्या कलागुण व कौशल्याला आकार येत गेला.लहानपणापासूनच तन्वीला तिच्या परिवाराकडून प्रोत्साहन मिळत आलेले आहे. तन्वीने या विजयाचे श्रेय तिच्या परिवारातील सदस्य, मित्र मंडळी व सर्व शुभचिंतकांना दिले आहे. या स्पर्धेत विजयी झाल्याबद्दल सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तन्वी ही मल्हार कम्युनिकेशन्सचे संचालक आनंद मल्हारा व नलिनी मल्हारा यांची कन्या आहे.