जळगाव। शहरातील अक्सानगर भागातील रहिवाशी सेवानिवृत्त शिक्षिका खान तब्बसुमजहां मोहंमद हनिफ या स्वाईन फ्लूच्या बळी ठरल्या आहेत. त्या 66 वर्षांच्या होत्या. प्रारंभीच्या काळात त्यांच्यावर शहरातील आर्कीड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र, प्रकृती ढासळल्याने त्यांना औरंगाबादेत हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. 15 दिवसांपासून त्यांच्यावर औरंगाबादेतील एमआयटी सुपर स्पेशालिटी अॅण्ड क्रिटीकल केअर सेंटर रुग्णालयात उपचार सुरु होते. आरोग्य यंत्रणेला आता स्वच्छतेवर भर द्यावा लागेल.
गाफील न राहण्याचा धडा
स्वाईन फ्लू या जीवघेण्या आजाराचे विषाणू थंड वातावरणात लवकर पसरतात किंवा लगेच सक्रीय होतात, असा सर्वसाधारण समज आहे. त्यामुळे जलगावसारख्या सतत उष्ण व दमट वातावरण असलेल्या शहरांत या विषाणुंचा प्रादुर्भाव होण्याची भिती बाळगण्याचे कारण नाही असाही सार्वत्रिक समज आहे. हे समज खोटे ठरविणारे स्वाईन फ्लूचे बळी यापुर्वी नागपुरात गेले आहेत. त्यानंतर आता जळगाव शहरातील महिलाही या आजाराची बळी ठरल्याने याबाबत गाफील न राहण्याचा धडा या घटनेने दिला आहे. या आजाराचे निदान होण्यास लागणारा वेळ ही खरी अडचण आहे. या आजारावरील उपचारांसाठी खासगी रुग्णालयांमध्ये येणारा खर्च सामान्य लोकांना परवडणारा नाही व जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये सुसज्ज यंत्रणा नसल्याने शहर व जिल्ह्यात या आजाराचा फैलाव होणे कुणालाच परवडणारे नाही, या काळजीने जळगावकरांना विचारात टाकले आहे.
स्वच्छता हाच बचावाचा मार्ग
सार्वजनिक स्वच्छता हाच या आजाराच्या पैलावापासून बचावाचा सर्वोत्तम मार्ग असल्याने लोकांनी सरकारी यंत्रणांच्या भरवशावर न राहता परिसर स्वच्छतेबाबत दक्ष राहणे गरजेचे ठरले आहे. या आजाराची सुरुवातीच्या काळातील लक्षणे सर्वसाधारण थंडीतापासारखी दिसत असल्याने बराच वेळ डेंग्यू अथवा मलेरीया झाल्या समज होऊन डॉक्टरांनाही हा आजार चकवा देणारा ठरतो, असे आतापर्यंतचे अनुभव आहेत. रुग्णाची प्रकृती गंभीर होऊन तो अन्य तापांच्या प्रकारांच्या उपचारांना प्रतिसाद देऊ शकत नाही तेंव्हाच स्वाईन फ्लूच्या आजाराची शंका घेतली जाते व त्या अनुषंगाने आवश्यक तपासण्यांना सुरुवात केली जाते. मात्र, तोपर्यंत बराच उशिर झालेला असतो.