जळगावचे धावणारे डॉ. रवि हिराणी गिनीज बुकात!

0

जळगाव । सा तारा हिल हॉफ मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झालेले शहरातील डॉ. रवि हिराणी यांच्याही नावाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्डस रेकॉर्डस्मध्ये झाली आहे. न थांबता एका दमात 30 किमी धावण्याचे बळ सरावाने मिळवणारे डॉ. हिराणी या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणारे जिल्ह्यातील एकमेव धावपटू होते. त्यांच्याच पुढाकाराने स्थापन झालेल्या जळगाव रनर्स गृपची सदस्यसंख्या वर्षभरात 6 वरुन 160 वर पोहचलेली आहे, 40 महिला सदस्याही या गृपमध्ये आहेत. या स्पर्धेतील सहभागाची नोंद जागतिक विक्रमात झाल्यानंतर चर्चेत आलेले डॉ. हिराणी यांनी आतापर्यंतच्या वाटचालीतील प्रेरणादायी अनुभवांसाठी संपर्काचे आवाहनही केले आहे.मानसिक व शारीरिक मरगळ झटकून टाकणारा हा चैतन्यदायी व्यायाम आहारालाही शिस्त लावतो हे औषधांवर खर्च करणारांनी लक्षात घ्यावे, धावण्याच्या आरोग्यदायी व्यायामाबद्दल समाजात जागरुकता वाढावी हाच हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.

जळगाव रनर्स गृपने बळ दिले
या गृपची स्थापना डॉ. रवि हिराणी यांच्या सहकार्‍यांनीं 14 फेब्रुवारी 2016 रोजी केली. किरण बच्छाव, विक्रांत सराफ, निलेश भांडारकर, नरेंद्रसिंह सोळंकी हे या गृपचे प्रारंभीचे सदस्य होते. समाजात रनिंग कल्चर वाढावे हाच या गृपचा हेतू आहे. हे सदस्य सुरुवातीला विद्यापीठ परिसरात दर रविवारी धावत होते. नेहमीच्या सरावाने त्याचवेळी एका दमात 21 किमी धावण्याची क्षमता बहुतांश सदस्यांनी विकसित केलेली होती. 5 वर्षांपासून 65 वर्षे वयापर्यंत सर्व वयोगटातील हे सदस्य आहेत. त्यात डॉक्टर्स, प्राध्यापक, वकील, सी.ए., विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्तेही आहेत. डॉ हिराणी यांचे नाव गिनीज बुकात नेणारी सातारा हिल हॉफ मॅरेथॉन स्पर्धा 18 सप्टेंबर, 2016 रोजी आयोजित करण्यात आली होती . या स्पर्धेचे ते 5 वे वर्ष होते. 1700 फूट उंचीपर्यंतचा 10 किमी अंतराचा घाट धावत चढणे हे या स्पर्धेतील स्पर्धकांना दिलेले उद्दीष्ट असते. नोंदणी केलेल्या 5 हजार स्पर्धकांपैकी 4 हजार 81 स्पर्धक या स्पर्धेत प्रत्यक्ष धावले होते.

सरावाची धावपळ
या स्पर्धेत सहभागी होण्याचे ठरविल्यानंतर डॉ. हिराणी यांनी सरावासाठी ङ्ग धावपळफ केली. दर शनिवारी फर्दापुरला मुक्कामी जाऊन रविवारी सकाळी अजिंठा गावापर्यंत ते अजिंठा घाट धावत चढत होते. हे अंतर 19 किमीपर्यंत धावून पूर्ण करणे त्यांनी निश्‍चित केलेले होते.या सरावाच्या दुसर्‍या टप्प्यासाठी त्यांनी पाल ते खिरोदादरम्यान असलेल्या घाटाची निवड केलेली होती. या घाटातही त्यांचे लक्ष्य 19 किमी धावण्याचेच होते. पहाटे 4 वाजता धावणे सुरु करुन 6.30 वाजेपर्यंत पूर्ण करण्याचा वेळ त्यांनी ठरवून घेतलेला होता.