जळगाव : क्रीडा क्षेत्रात जळगावचे नाव उंचावले आहे. फिरकी गोलंदाजीने फलंदाजांना जेरीस आणणारा जळगावचा शशांक अत्तरदे रणजी क्रिकेट स्पर्धेत दिसणार आहे. आतापर्यंत जिल्हास्तरीय, क्लबकडून शशांकने मोठी कामगिरी केली आहे. रणजीच्या मुंबई संघात शशांक अत्तरदेची अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड झाली आहे. रणजी स्पर्धेतून खेळणारा शशांक हा जळगावातील पहिला खेळाडू ठरला आहे. शशांक हा जळगावमधून बाहेर गेलेला एकमेव खेळाडू आहे. रणजी क्रिकेट स्पर्धेकरीता निवड झालेल्या मुंबई संघात त्याची निवड झाली आहे. जळगावसाठी हा प्रथमच बहुमान मिळाला आहे. या संघात भारतीय संघातील दिग्गज खेळाडू अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ यांच्यासोबत शशांक अत्तरदे खेळणार आहे.
जळगावातील रहिवासी असलेला शशांक विनायक अत्तरदेला शालेय जीवनापासून क्रिकेटची आवड आहे. सुरवातीला ला. ना. विद्यालयातून क्रिकेट खेळला. यानंतर जैन स्पोर्टस् अकॅडमीकडून आंतर शालेय क्रिकेट स्पर्धा, जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी केली आहे.
शशांक अत्तरदे सहा वर्षांपासून मुंबईत राहून क्लब क्रिकेट व कार्पोरेट क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळला आहे. तसेच मे 2019 मध्ये मुंबई टी- 20 लिग स्पर्धेत देखील उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तर कर्नाटक येथे झालेल्या केएससीए टुर्नामेंटमध्ये मुंबईकडून खेळला आहे. या स्पर्धेत खेळलेल्या तीन सामन्यात दहा गडी बाद करून सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा बहुमान मिळविला आहे. यात त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी ही 30 षटकात 75 रन देत 5 गडी बाद केले आहेत.