जळगाव– येथील कोव्हिड रुग्णालयात संशयित म्हणून दाखल होणाऱ्या रुग्णांचे अहवाल उशिरा येत असल्याने उपचारात दिरंगाई होत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते योगेश देसले यांनी थेट खासदार तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याकडे केली. यासंदर्भात खासदार शरद पवार यांनी देखील तितकाच सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हा कोविल रुग्णालयातील परिस्थितीबाबत लक्ष घालण्याचे आश्वासन देसले यांना दिले. दरम्यान या संदर्भात स्थानिक प्रशासनाला देखील सूचना केल्या जातील असे त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे त्या त्या ठिकाणची स्थानिक परिस्थिती जाणून घेण्यासाठी कार्यकर्त्यांची संवाद साधत आहेत. जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते योगेश देसले यांनी देखील खासदार शरद पवार यांच्याशी संवाद साधला. आज त्यांना खासदार पवार यांच्याकडून फोन आल्यावर त्यांच्यात संवाद झाला. यावेळी देसले यांनी २ मुद्दे मांडले. देसलेंनी सांगितले की, जळगाव येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल संशयित रुग्णांचे कोरोना तपासणीचे अहवाल ५ दिवस उशीरा येत आहेत. त्यामुळे रुग्णावर उशीरा उपचार होत असून तो दगावण्याची शक्यता वाढते आहे. शहरात ५० संशयित रुग्ण आहेत.
खा. पवारांकडे जळगावची इत्थंभूत माहिती
देसले ही माहिती देत असताना पवारसाहेबांनी थांबायला सांगितले. आणि जळगावची माहिते देत ते तिकडून म्हणाले, जळगावात ५७ संशयित आहे. ४ दगावले आहेत. ग्रामीण मध्ये अमळनेर वगळून स्थिती बरी आहे. तरी सुद्धा जळगावात लवकर तपासणी अहवाल यावेत यासाठी सूचना दिल्या जातील असे खासदार पवार यांनी सांगितले. देसले यांनी दुसरा मुद्दा मांडला की, आरोग्य विभाग ३० हजार पदे भरणार आहेत. ही पदे भरताना एनएचएम (नैशनल हेल्थ मिशन) च्या २० हजार करारावरील कर्मचाऱ्यांना सेवेत घ्यावे. यावर पवारसाहेबांनी विचारले, ‘सध्या ही मंडळी कुठे आहे ?’ त्यावर देसले म्हणाले, हे सर्व कर्मचारी सध्या गावांवर नेमणुकीच्या ठिकाणी सेवा देत आहे.’ यावर पवारसाहेब ‘ठिक आहे लक्ष घालतो असे सांगितले. देसले यांनी जळगाव सिव्हिलमधील गाऱ्हाणे थेट खा. पवार यांच्याकडे मांडले असून याबाबत आता खुद्द खासदार शरद पवार हे लक्ष घालणार आहे.