जळगाव । शालकाच्या लग्नाच्या पत्रिका वाटायला गेलेल्या बबलू सुभाष नवले (वय 33) या जळगावातील तरूणावर कोल्हापुर जिल्ह्यातील इचलकरंजी येथे शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजता 7 ते आठ जणांनी गुप्ती व धारदार शस्त्राने हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या बबलू याला कोल्हापूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी साडे नऊ वाजता त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी शिवाजी नगर, इचलकरंजी पोलीस स्टेशनला कुणाल सावंत, त्याचा मामा व अन्य 4 ते 5 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बबलू याचा शालक विशाल विनायक नेतलेकर याचे 8 मे रोजी इचलकरंजी येथे लग्न आहे. मुलगी इचलकरंजी येथील असल्याने लग्न सोहळा तिच्याकडे आयोजित करण्यात आला आहे. या लग्नाची पत्रिका वाटपासाठी बबलू व त्याची मेहुणी लक्ष्मी असे दोघं जण 2 मे रोजी रेल्वेने जळगाव येथून गेले होते.
चुलत शालकाचा होता जुना वाद
कोल्हापूर, सातारा, नीर, ता.बारामती येथे पत्रिका वाटप झाल्यानंतर बबलू व त्याचा चुलत शालक रोहन सावंत हे दोन्ही जण शुक्रवारी दुचाकीने इचलकरंजी परिसरातील पत्रिका वाटपाचे काम करीत असताना रात्री साडे नऊ वाजता दकनूर चौकात रोहन व कुणाल सावंत यांच्यात वाद झाला. दोघांमध्ये यापूर्वीही वाद होते. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. हा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या बबलूवर काही जणांनी गुप्ती व धारदार शस्त्राने हल्ला केला. बबलू गंभीर जखमी झाल्याचे पाहून हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. यावेळी तातडीने बबलूला इचलकरंजी येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले त्यानंतर कोल्हापूरला हलविण्यात आले.
सात जणांविरुध्द गुन्हा
या घटनेप्रकरणी कुणाल सावंत, त्याचा मामा व अन्य पाच जण अशा सात जणांविरुध्द रात्रीच इचलकरंजीतील शिवाजी नगर पोलीस स्टेशनला कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी सकाळी बबलूची प्राणज्योत मालवल्याने खुनाचे कलम वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.