जळगाव : महापौर सीमा भोळे यांनी राजीनामा दिल्याने झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या भारती सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपने त्यांना महापौरपदाची उमेदवारी दिली होती. त्यांनी २४ रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शिवसेनेनेही भाजपला समर्थन दिल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली. अर्ज दाखल केल्यानंतर त्यांची निवड निश्चित झाली होती, केवळ औपचारिक घोषणा बाकी होती. आज सोमवारी निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी निवडीची घोषणा केली. निवडीची घोषणा झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी केली.
भारती सोनवणे ह्या उपमहापौर राहिलेल्या आहेत. त्या भाजप नेते स्वीकृत नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या पत्नी आहेत. माजी मंत्री गिरीश महाजन यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून कैलास सोनवणे यांची ओळख आहे.