जळगावच्या विवाहितेचे बारामती बसमधून सव्वा लाखाचे दागिने लांबवले

0

फैजपूर पोलिसात गुन्हा ; सीसीटीव्हीवरून चोरट्यांचा शोध सुरू

भुसावळ- जळगाव येथील महिला फैजपूर येथे माहेरी आल्यानंतर परतीच्या प्रवासात निघाली असताना फैजपूर ते भुसावळदरम्यान रावेर-बारामती बसने प्रवास करीत असताना अज्ञात चोरट्यांनी विवाहितेचे एक लाख 20 हजार रुपये किंमतीचे दागिने लांबवल्याने खळबळ उडाली. गुरूवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. शहर पोलिस ठाण्यात अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तो फैजपूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. दरम्यान, फैजपूर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारावरून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

महिलेसह पुरूषावर संशय
रावेर-बारामती बस (क्रमांक एम.एच.20 बी.एल.2489) मधून जळगावच्या रहिवासी असलेल्या हर्षाली सचिन पाटील या त्यांच्या मुलांसह बसल्या असताना त्यांनी चालकाजवळ जांभळ्या रंगाची एअरबॅग चालकाजवळ ठेवली होती. या बॅगेत लहान पर्समध्ये सोन्याचा चपला हार व मंगळसूत्र ठेवण्यात आले होते तर चालकाजवळदेखील बसलेल्या प्रवाशाने महिलेची बॅग उचलून पाटील यांच्या जवळ ठेवली. यावेळी पाटील यांच्या मागील सीटवर एक प्रवासी व दोन महिला प्रवासीदेखील बसले होते. त्यांनी जळगाव येथे जाण्यासाठी तिकीट घेतले असताना भुसावळात बस आल्यावर यावल नाक्यावर दोघेही उतरले तर नाहाटा चौफुलीजवळ गाडी आल्यानंतर हर्षाली पाटील यांनी बॅग तपासली असता त्यात दागिने नसल्याचे लक्षात आले. या घटनेनंतर बस थेट नशिराबाद पोलिस ठाण्यात नेण्यात आली मात्र हा प्रकार फैजपूर ते भुसावळ दरम्यान घडल्याने भुसावळ शहर पोलिसात हर्षाली पाटील यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करून तो फैजपूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. दोन अनोळखी पुरूषांसह एका महिलेवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. दरम्या, फैजपूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी महिलेने ज्या बसने प्रवास केला त्या बसचे सीसीटीव्ही फुटेज तपासणार असून त्यानंतर संशयीतांचा शोध घेण्यात येईल, असे सांगितले. दागिने लांबवण्याने आल्याने महिलेला अश्रू आवरणे कठीण झाले तर पोलिसांनी मात्र महिलेला धीर दिला.