मुंबई | जळगाव येथे सुरू होणाऱ्या एकात्मिक शासकीय वैद्यकीय संकुलासाठी जळगाव येथील सामान्य जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरण करण्यास, तसेच नंदुरबार येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी सामान्य जिल्हा रुग्णालयाची जागा वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्यास मान्यता देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी जाहीर केले.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वैद्यकीय शिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभागाची बैठक झाली. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव संजय देशमुख उपस्थित होते.
या बैठकीत नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठद्वारा प्रस्तावित पदव्युत्तर आयुर्विज्ञान संस्था (पी.जी. इन्स्टिट्यूट) सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली. या प्रस्तावित संस्थेमध्ये २०१९-२० पासून १२ विषयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करणे प्रस्तावित आहे. ही संस्था सुरू करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, वैद्यकीय शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागाने संयुक्त प्रयत्न करावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.