एकतर्फी प्रेमातून एमआयडीसी पोलीस ठाण्यात 12 पानांचे पत्र ; नरेंद्र मोदींसह पोलीस अधीक्षक अधिक्षक, जिल्हा विशेष शाखेलाही दिले अर्ज
जळगाव : प्रेमाला कुठलीही सीमा नाही… प्रेम आंधळ असत, त्यामुळे ते कधी कुणावर होईल, हे सांगता येत नाही, अस कवींनी आपल्या कवितांमधून मांडले आहे. याच शब्दांना अनुसरुन एमआयडीसी स्टेशनच्या हद्दीत राहणारी शिक्षिका एकतर्फी प्रेमातून अभिनेता सलमान खानच्या प्रेमात आंधळी झाली आहे. एवढेच नाहीतर या शिक्षिकेने चक्क सलमान खान सोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींसह पोलीस अधीक्षक व एमआयडीसी पोलीस ठाण्यात बारा पानांचे पत्र दिले असून इतरांनाही अर्ज केला आहे. शिक्षिकेच्या अनोख्या प्रेमामुळे डोक्याला ताप झालेल्या एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी शिक्षिकेचा अर्ज निकाली काढला आहे.
एमआयडीसी स्टेशनच्या हद्दीतील एका शाळेत कार्यरत तसेच रहिवासी शिक्षिकेने पोलिसांना दिलेल्या पत्रानुसार असे की, शिक्षिका घरात एकटी असून तिचे लग्न झालेले नाही. तसेच तिला आई, वडील कोणीच नाही, असे म्हटले आहे.
जीवनासाथी म्हणून सलमान खानच हवा
पत्रात शिक्षिकेने म्हटले आहे की, मला कुणा दुसर्यासोबत लग्न करायचे नाही. जीवनसाथी म्हणून मी सलमान खानची निवड केली आहे. तो मला हवा असून एक पत्नी म्हणून जबाबदारी पार पाडून त्याच्याशी मी आनंदाने संसार करेन. माझ्याप्रमाणेच सलमानही अविवाहित असून त्याचीही कुणाशीतरी लग्न करण्याची इच्छा आहे, असेही तिने 12 पानांच्या पत्रात म्हटले आहे.
अर्जाचा पाऊस अन् पोलिसांना ताप
या शिक्षिकेने नुसतीच लग्नाची इच्छा व्यक्त केली नसून तशा आशयाचे 12 डिसेंबर 2018 रोजी सविस्तर पत्रही जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा विशेष शाखा तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षकांच्या नावे पाठविले आहे. चौकशी झाल्यानंतर अधीक्षक तसेच जिल्हा विशेष शाखेचे अर्ज पुन्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात आल्याने येथील पोलिसांचा डोक्याचा ताप वाढला. आपल्या अख्यातरीत नसलेल्या शिक्षिकेच्या मागणीचे करायचे तरी काय या प्रश्नाने ठाणे अंमलदारासह अधिकार्यांना सतावून सोडले. अखेर तिची समजूत काढून तसेच अधिकारात हा विषय नसल्याचे सांगत अर्ज निकाली काढण्यात आला. यानंतर संबंधित तरुणीने पोलीस ठाण्यातून काढता पाय घेतला, अशी माहिती संबंधित अंमलदाराने बोलतांना दिली.