जळगावत आजपासून “श्री गणपती म्युरल”

0

जळगाव: खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीतर्फे “आनंदयात्री” डॉ.जी.डी.बेंडाळे यांच्या जन्मशताब्दी समारोपाच्या प्रकट कार्याक्रमाप्रित्यर्थ एक लाख एक लिटरच्या प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये रंग भरून भव्य असे “श्री गणपती म्युरल”आजपासून दि. ११ व १२ सप्टेंबर रोजी सलग ३६ तासात एकलव्य क्रीडा संकुलाच्या मैदानावर तयार करण्यात येणार आहे. याबाबतची तयारी पूर्ण झाली आहे.

“श्री गणपती म्युरल” च्या माध्यमातून खान्देशचे नाव जागतिक पातळीवर पोहोचणार असून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंदले जाणार आहे. या संस्थांचे प्रतिनिधी डॉ.ममता काबरा यांचे सहकार्य लाभत आहे.११ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेला केसीई सोसायटीचे सदस्य दीपक घाणेकर यांचे हस्ते उद्घाटन होईल.

यावेळी आ.सुरेश भोळे, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, माजी महापौर ललित कोल्हे, सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष सचिन नारळे, केसीईचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, डॉ. ममता काबरा उपस्थित राहतील.

ओजस्विनी कला महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश काटे व त्यांचे ५० सहकारी ३६ तासात हा उपक्रम पूर्ण करणार आहे.तयार झालेले “श्री गणपती म्युरल” पाहण्यासाठी १३ ते २२ सप्टेंबर दरम्यान नागरिकांसाठी खुले केले जाणार आहे. दरम्यान १५ सप्टेंबरपासून सायंकाळी ७ ते ८ यावेळेत सांस्कृतिक कार्यक्रमही केसीई संस्थेच्या विविध शाखा सादर करतील.

या करिता विविध २१ समित्या कार्यरत असून मुख्य व्यवस्थापन समितीत अध्यक्ष म्हणून प्रा.चारुदत्त गोखले, उपाध्यक्ष डॉ.उदय कुलकर्णी, कार्याध्यक्ष डॉ.डी.जी.हुंडीवाले, कोषाध्यक्ष शशिकांत वडोदकर, सचिव संजीव पाटील, समन्वयक अविनाश काटे,सदस्य गो.ह.अत्तरदे, डॉ.अशोक राणे यांचा समावेश आहे.