जळगावनंतर भुसावळातही झारखंड जाणारे प्रवासी पकडले

0

12 वाहनांमधून 60 प्रवाशांचा जीवघेणा प्रवास : स्थानिक वैद्यकीय पथकाकडून जागेवरच वैद्यकीय तपासणी : पोलिसातही माणुसकीचा झरा : पाण्यासह जेवणाची केली सोय

भुसावळ : देशभरात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर प्रवासी वाहतूक ठप्प झाली आहे तर उद्योगधंदे बंद झाल्याने दोन वेळच्या जेवणाची परवड होत असल्याने झारखंड राज्यातील कामगार पायी तसेच खाजगी टॅक्सीने गावाकडे निघाले आहेत मात्र प्रवासाची कुठलीही परवानगी नसल्याने जळगावात शनिवारी तीन टॅक्सीमधील 15 प्रवाशांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर भुसावळातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील हॉटेल सुहास समोर तब्बल 12 वाहनांमधून प्रवास करणार्‍या 60 प्रवाशांना पोलिसांनी चौकशीसाठी थांबवून ठेवले आहे. या प्रवाशांकडे प्रवासी वाहतुकीसाठी कुठलीही परवानगी नसल्याने स्थानिक वैद्यकीय पथकाकडून त्यांची सुरूवातीला तपासणी केली जात आहे.

मुंबईनंतर थेट भुसावळात अटकाव
विशेष म्हणजे 12 टॅक्सीद्वारे शुक्रवारी मध्यरात्री निघालेल्या या प्रवाशांना रस्त्यातच कुठेही अटकाव झाला नाही तर भुसावळातील महामार्गावरून हे प्रवासी जात असताना बाजारपेठ पोलिसांनी त्यांना हटकल्यानंतर खरा प्रकार समोर आला. सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे, एएसआय एजाज पठाण, एएसआय गयासोद्दीन शेख, बंटी कापडणे, प्रशांत परदेशी, सचिन पोळ आदींनी या प्रवाशांना प्रवासाच्या परवानगीबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे कुठलीही परवानगी नसल्याचे समोर आले.

पथकाकडून जागेवरच वैद्यकीय तपासणी
पोलिसांनी स्थानिक वैद्यकीय प्रशासनाला कळवल्यानंतर त्यांची जागेवरच वैद्यकीय तपासणी केली जात आहे. 12 वाहनातून सुमारे 55 ते 60 प्रवासी प्रवास करीत असल्याचे समोर आले आहे. प्रवाशांचे जेवणासाठी हाल न होण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या जेवणाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केल्याचे सूत्रांनी सांगितले.