जळगावसह 15 जिल्ह्यांत शाश्‍वत शेती अभियान

0

साक्री । साक्री तालुक्याला वरदान असलेला साखर कारखाना लवकरच सुरु करणार असून यासाठी माझ्यासह केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. यामुळे तालुक्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासोबतच तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. जळगावसह आत्महत्याग्रस्त 15 जिल्ह्यात 4 हजार कोटींची तरतूद असलेले शाश्‍वत शेती अभियान सुरु केले आहे. यातून शेतकर्‍यांना पायाभूत सुविधा मिळण्यास मदत होणार आहेत, असे कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणी पुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले. पिंपळनेरला विजय भोसले या शिक्षकाच्या निवृत्ती निरोपसमारंभात ते बोलत होते. या भाषणात सदाभाऊ खोत यांनी राज्यभर सुरु केलेल्या शेतकरी बाजाराची माहिती दिली. शेतकरी बाजारामुळे शेतमालाचे भाव ठरविणार्‍या दलालांकडून होणारी पिळवणूक थांबविण्याचे काम प्रभावीपणे करता यावे म्हणून पुढच्या काळातही पाठपुरावा सुरु राहील.

नाशिक जिल्ह्यात कांदा निर्यात सुविधा केंद्र
नाशिक जिल्ह्याला कांदा हब बनविणार त्यावाठी या जिल्ह्यात कांदा निर्यात सुविधा केंद्र उभारणार असून शेतकरी आत्महत्याग्रस्त 15 जिल्ह्यात शाश्‍वत शेती अभियानासह स्वयंचलित 2065 हवामान केंद्रे उभारली जाणार आहेत या केंद्रांमुळे 10 दिवस अगोदर गारपिट, वादळाची सूचना मिळेल. कांदा चाळींसाठी 55 कोटी रुपये आतापर्यंत दिले असून नव्या कांदा चाळींसाठीही नवीन आराखडा तयार केला जाणार आहे. दोन दिवसांनी मुंबईत बैठक होत आहे. पुढच्या आठवड्यात आम्ही पुन्हा बसणार आहोत. मला घडविण्याचे काम या मातीने केले. मला कौटुंबिक प्रेम या तालुक्याने दिले. आम्ही दोघं मिळून हा साखर कारखाना सुरु करण्यासाठी प्रयत्न करु, असेही सदाभाऊ खोत यावेळी म्हणाले.

जळगाव जिल्ह्याचाही समावेश
राज्यात विदर्भ, मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. शाश्‍वत शेतीचे कार्यक्रम आत्महत्या झालेल्या जिल्ह्यात घ्यावे लागतील. विदर्भातील सहा जिल्हे, मराठवाड्यातील 8 जिल्हे, खान्देशमधील जळगाव जिल्हा असे 15 जिल्हे शाश्‍वत अभियानांतर्गत घेतले. जागतिक बँकेच्या सहाय्याने 4 हजार कोटींची तरतूद केली आहे. पायाभूत सुविधा शेतकर्‍यांना कशा मिळतील, हा दृष्टीकोन या अभियानात आहे.