जळगावातील आठ केंद्रांवर आजपासून ‘शिवभोजन’

0

जिल्हा पुरवठा विभागातर्फे केंद्रचालकांना प्रशिक्षण

जळगाव – गरजू आणि गरीब व्यक्तींना स्वस्त दरात भोजन उपलब्ध व्हावे या उद्देशाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या ‘शिवभोजन’ योजनेचा उद्या दि. २६ रोजी शहरातील दोन केंद्रांवर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. दरम्यान योजनेच्या अंमलबजावणीसाठी आज केंद्रचालकांना जिल्हा पुरवठा विभागातर्फे प्रशिक्षण देण्यात आले.
राज्यात सत्ता स्थापन करण्यापुर्वीच उध्दव ठाकरे यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात ‘शिवभोजन’ योजनेची घोषणा केली होती. दहा रूपयात भोजन अशी संकल्पना त्यांनी मांडली होती. या संकल्पनेला उद्या दि. २६ रोजी मुर्तस्वरूप येत आहे. जळगाव जिल्ह्यातही ‘शिवभोजन’ योजनेचा शुभारंभ उद्या दि. २६ रोजी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षा ना. रंजना पाटील, खा. रक्षा खडसे, खा. उन्मेष पाटील, आ. डॉ. सुधीर तांबे, आ. स्मिता वाघ, आ. चंदूलाल पटेल, आ. किशोर दराडे, आ. गिरीश महाजन, आ. संजय सावकारे, आ. राजूमामा भोळे, आ. किशोर पाटील, आ. चिमणराव पाटील, आ. शिरीष चौधरी, आ. लता सोनवणे, आ. अनिल पाटील, आ. मंगेश चव्हाण, आ. चंद्रकांत पाटील हे उपस्थित राहणार आहे. प्रायोगीक तत्वावर जळगाव शहरातील आठ ठिकाणी ‘शिवभोजन’ केंद्र सुरू केले जाणार आहे. यात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील उपहारगृह, नविन बसस्थानक, शासकीय रूग्णालय, रेल्वे स्थानक परिसर, तहसील कार्यालय परिसर, गोलाणी मार्केट, शनिपेठ, बळीरामपेठ, रथचौक परिसर, कृषी उत्पन्न बाजार समिती याठिकाणांचा समावेश आहे. यातील जिल्हा शासकीय रूग्णालय येथे उद्या २६ रोजी सकाळी १०.३० वा. व सकाळी ११ वा. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील उपहारगृह येथे ‘शिवभोजन’ केंद्रांचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
असे राहील ‘शिवभोजन’
शिवभोजन योजनेत जळगाव जिल्ह्यासाठी ७३० थाळी मंजूर करण्यात आली आहे. सद्यस्थितीला जळगाव शहरातच ही योजना सुरू होणार असुन तीन महिन्यानंतर या योजनेचा आढावा घेतल्यानंतर तालुकानिहाय केंद्र सुरू केले जाणार आहे. शिवभोजन अंतर्गत १०० ग्रॅम भाजी आणि दाळीचे वरण, १५० ग्रॅम भात आणि ३० ग्रॅम वजनाच्या दोन पोळ्या अशी ही थाळी राहणार आहे. पहिल्या ७५ ग्राहकांना शिवभोजन घेता येणार आहे. दुपारी १२ ते २ यावेळेतच हे शिवभोजन मिळणार आहे.
केंद्रचालकांना प्रशिक्षण
जिल्हा पुरवठा विभागातर्फे आज केंद्रचालकांना केंद्र चालविण्यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. तसेच केंद्रचालकांसाठी ‘शिवभोजन अ‍ॅप’ तयार करण्यात आले असुन त्याचा युझर आयडी देखिल त्यांना आज देण्यात आला. या आयडीनुसार कुपन वाटप केले जाणार असुन शिवभोजन घेणार्‍या व्यक्तीचा फोटो आणि नाव देखिल लिहीले जाणार आहे. तरी गरजू व्यक्तींनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी केले आहे.